Homeमहाराष्ट्रशिर्डीशिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिकपणाचे सर्वत्र कौतुक

हरवलेल्या चार सोन्याच्या अंगठ्या साईभक्ताला परत; मानवतेचा आदर्श निर्माण

शिर्डी | प्रतिनिधी : – शिर्डी साईबाबा संस्थानचे कर्मचारी केवळ सेवाभावी वृत्तीने काम करत नाहीत, तर ते प्रामाणिकपणा, सचोटी आणि मानवतेचा आदर्श देखील जपत असल्याचा प्रेरणादायी अनुभव नुकताच समोर आला आहे. हैदराबाद येथून साईबाबांच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्त श्रीनिवास राव यांच्या कुटुंबाच्या चार सोन्याच्या अंगठ्या हरवल्यानंतर संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली तत्परता आणि प्रामाणिकपणा यामुळे सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.

हैदराबाद येथील श्रीनिवास राव हे आपल्या कुटुंबासह १ फेब्रुवारी रोजी साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत आले होते. त्यांनी साईबाबा संस्थानच्या द्वारावती भक्तनिवास येथे वास्तव्य केले होते. त्यांना खोली क्रमांक ४०८ आणि ४३४ मिळाली होती. श्रीनिवास राव आणि त्यांचे कुटुंबीय तीन दिवस भक्तनिवासात राहून साईबाबांचे दर्शन, पूजा आणि विविध धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी झाले होते. साईबाबांच्या चरणी सेवा करून आध्यात्मिक समाधान लाभल्याने ते अत्यंत आनंदी होते. तीन दिवसांचा मुक्काम पूर्ण केल्यानंतर ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे साडेचार वाजता त्यांनी भक्तनिवासातून चेक-आऊट केले. त्यांना सायंकाळी ५ वाजताची हैदराबादकडे जाणारी ट्रेन पकडायची होती. त्यामुळे घाईगडबडीत त्यांनी सामान तपासण्यास वेळ दिला नाही.

मुक्कामादरम्यान श्रीनिवास राव यांनी चार सोन्याच्या अंगठ्या उशीखाली ठेवलेल्या होत्या. मात्र, ट्रेन पकडण्याच्या घाईत त्यांनी त्या अंगठ्या खोलीतच विसरल्या. ट्रेनमध्ये बसल्यानंतर काही वेळाने त्यांना द्वारावती भक्तनिवासातील कर्मचाऱ्यांचा फोन आला.
फोनवर कर्मचाऱ्यांनी त्यांची ओळख पटवून घेत अंगठ्या विसरल्याची माहिती दिली. ही बातमी ऐकून श्रीनिवास राव पूर्णपणे धक्का बसला. कारण ट्रेन सुटण्याच्या तयारीत होती आणि त्यांच्याकडे भक्तनिवासात परत जाण्यासाठी वेळ नव्हता.

दरम्यान, खोलीची साफसफाई करत असताना मदतनीस किशोर धरम यांना गादीखाली चार सोन्याच्या अंगठ्या सापडल्या. त्यांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती दिली. त्यानंतर द्वारावती भक्तनिवासचे अधीक्षक योगेश गोरक्ष, मॅनेजर सचिन वरनारायण, सुपरवायझर सचिन डावरे आणि कर्मचारी सागर शेळके यांनी संयुक्तरीत्या पुढील कार्यवाही सुरू केली. सर्वांनी मिळून साईभक्त श्रीनिवास राव यांचा मोबाईल नंबर शोधून काढला आणि त्यांच्याशी संपर्क साधला. त्यावेळी श्रीनिवास राव यांची ट्रेन साईनगर रेल्वे स्टेशनवर उभी असल्याची माहिती मिळाली.

साईभक्तांना अंगठ्या वेळेत परत मिळाव्यात यासाठी कर्मचारी तत्काळ मोटारसायकलवरून रेल्वे स्टेशनकडे रवाना झाले. मात्र ते स्टेशनवर पोहोचेपर्यंत ट्रेन सुटली होती. त्यामुळे श्रीनिवास राव यांनी त्यांच्या एका नातेवाईकाला स्टेशनवर थांबण्यास सांगितले होते. कर्मचाऱ्यांनी त्या व्यक्तीची ओळख खात्री करून घेत सोन्याच्या अंगठ्या त्याच्या ताब्यात सुपूर्द केल्या. अंदाजे दोन तोळे सोन्याच्या या अंगठ्या परत मिळाल्याने श्रीनिवास राव आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला.

या प्रामाणिक कामाबद्दल श्रीनिवास राव यांनी कर्मचाऱ्यांना पैसे देण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी अत्यंत नम्रपणे पैसे घेण्यास नकार दिला. त्यांनी आपले कर्तव्य बजावल्याची भावना व्यक्त केली. इतकेच नव्हे तर, अंगठ्या घेण्यासाठी आलेल्या व्यक्तीची ट्रेन चुकल्यामुळे कर्मचाऱ्यांनी त्याला ऑटो-रिक्षा पकडून दिली आणि पुढील प्रवासासाठी योग्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या मदतीमुळे त्या व्यक्तीला नागरकोइल येथे ट्रेन पकडता आली.

या घटनेनंतर श्रीनिवास राव यांनी साईबाबा संस्थानला पत्र लिहून कर्मचाऱ्यांचे मनापासून कौतुक केले आहे. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, कर्मचाऱ्यांचा प्रामाणिकपणा आणि सेवाभाव पाहून ते भारावून गेले. त्यांनी पैसे न घेता अंगठ्या परत केल्यामुळे संस्थेची प्रतिष्ठा आणखी वाढली आहे. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर शिर्डी परिसरात तसेच भाविकांमध्ये संस्थानच्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे. अनेकांनी सोशल मीडियावर या कर्मचाऱ्यांचे अभिनंदन करत त्यांना प्रेरणादायी उदाहरण म्हटले आहे. शिर्डी साईबाबा संस्थान हे देशातील सर्वात मोठ्या धार्मिक संस्थांपैकी एक असून दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येतात. भाविकांना चांगल्या सुविधा देण्याबरोबरच त्यांच्या वस्तूंची सुरक्षितता राखणे ही संस्थेची जबाबदारी असते. या घटनेमुळे संस्थानच्या सेवाभावी परंपरेला अधिक उजाळा मिळाला आहे. कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे भाविकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

आजच्या काळात हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे दुर्मिळ झाले असताना शिर्डी संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली सचोटी समाजासाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या कृतीमुळे साईबाबांनी दिलेल्या “सबका मालिक एक” या संदेशाचा खरा अर्थ प्रत्यक्षात उतरल्याचे दिसून आले. शिर्डी साईबाबा संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेली प्रामाणिकता, सेवाभाव आणि मानवता ही केवळ संस्थेची प्रतिष्ठा वाढवणारी नाही, तर समाजासाठी आदर्श निर्माण करणारी आहे. श्रीनिवास राव यांच्यासारख्या भाविकांना मिळालेला हा अनुभव साईबाबांच्या सेवेमधील पवित्रता अधोरेखित करणारा ठरला आहे. या घटनेमुळे भाविकांमध्ये संस्थानबद्दलचा विश्वास अधिक दृढ झाला असून कर्मचाऱ्यांचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
13.1 ° C
13.1 °
13.1 °
44 %
2kmh
0 %
Tue
29 °
Wed
31 °
Thu
31 °
Fri
31 °
Sat
29 °

Most Popular

error: Content is protected !!