सोनई | प्रतिनिधी | सोनई पोलीस ठाणे हद्दीतील चांदा गाव शिवारात कंदुरीच्या (जेवणाच्या) कार्यक्रमादरम्यान झालेल्या वादातून एका २३ वर्षीय तरुणाची गोळ्या झाडून निर्घृण हत्या झाल्याची खळबळजनक घटना रविवारी सायंकाळी घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून गावात तणाव निर्माण झाला आहे.
मयत तरुणाचे नाव शाहिद राज महंमद शेख (वय २३, रा. चांदा, ता. नेवासा, जि. अहिल्यानगर) असे आहे. या प्रकरणी सुरज लतीफ शेख (वय २३, रा. चांदा) याच्यासह त्याचा साथीदार अक्षय जाधव यांच्यावर गंभीर आरोप असून दोघेही सध्या फरार आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, चांदा गाव शिवारात आरोपी सुरज लतीफ शेख याच्या शेतात कंदुरीचा व जेवणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मयत शाहिद शेख हा बोकड कापण्यासाठी तेथे गेला होता. यावेळी साधारण सायंकाळी ४.४५ ते ५.०० वाजण्याच्या सुमारास शाहिद शेख, आरोपी सुरज शेख आणि अक्षय जाधव यांच्यात कोणत्यातरी कारणावरून तीव्र वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत होत असतानाच आरोपींनी जवळ असलेल्या अग्निशस्त्रातून शाहिद शेख याच्यावर गोळीबार केला. गोळी लागल्याने शाहिद शेख हा गंभीर जखमी होऊन खाली कोसळला. उपस्थितांनी तात्काळ मदतीचा प्रयत्न केला मात्र त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच सोनई पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. परिसराची पाहणी करून पंचनामा करण्यात आला. मयताचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी सिव्हिल हॉस्पिटल, अहिल्यानगर येथे पाठवण्यात आला आहे.या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून आरोपींच्या शोधासाठी स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत. आरोपींनी वापरलेले अग्निशस्त्र, वादाचे नेमके कारण आणि घटनेमागील पार्श्वभूमी याबाबत पोलीस सखोल तपास करीत आहेत. दरम्यान, तरुणाचा खून झाल्याच्या घटनेमुळे चांदा गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवला आहे. या घटनेचा पुढील तपास सोनई पोलीस करीत आहेत.




