Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरबंटी जहागीरदार हत्येप्रकरणी अटक आरोपींना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

बंटी जहागीरदार हत्येप्रकरणी अटक आरोपींना ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी

इतर संशयितही पोलिसांच्या रडारवर; गुन्ह्यामागील कटाचा सखोल तपास सुरू

श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहराला हादरवून सोडणाऱ्या बंटी उर्फ अस्लम जहागीरदार हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयाने दि. ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या खळबळजनक हत्येमागील नेमका कट, कारणे आणि सहभागी असलेले अन्य आरोपी यांचा शोध घेण्यासाठी पोलीस सध्या सखोल तपास करत आहेत. या प्रकरणात आणखी काहीजण पोलिसांच्या रडारवर आले असून त्यांचीही चौकशी लवकरच सुरू करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी दिली.

दि. ३१ डिसेंबर रोजी दुपारी कब्रस्तानात अंत्यविधी आटोपून अस्लम शेख ऊर्फ बंटी जहागीरदार हा आपल्या मित्राच्या दुचाकीवर मागे बसून घरी परतत असताना, सेंट लूक हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागाच्या गेटजवळ दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर पिस्तुलातून गोळीबार केला होता. या गोळीबारात गंभीर जखमी झालेल्या बंटी जहागीरदार याला तातडीने अहिल्यानगर येथे उपचारासाठी नेत असताना, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. भरदिवसा घडलेल्या या गोळीबारामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरात एकच खळबळ उडाली होती.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत श्रीरामपूर शहर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या चोवीस तासांत या गुन्ह्यातील कृष्णा अरुण शिनगारे (वय २३) व रवींद्र गौतम निकाळजे (वय २३) या दोघांना कोपरगाव परिसरातून बुधवारी रात्री उशिरा ताब्यात घेतले. अटक केलेल्या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना दि. ६ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

पोलीस तपासादरम्यान आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्याकडे सध्या सखोल चौकशी सुरू आहे. गुन्ह्यात वापरण्यात आलेले शस्त्र त्यांनी कुठून मिळवले, हत्येचा प्लॅन कसा आखण्यात आला, या गुन्ह्यामध्ये आणखी कोण-कोण सहभागी होते का, तसेच या हत्येमागील नेमके कारण काय, याबाबत पोलीस बारकाईने तपास करत आहेत. दरम्यान, या प्रकरणात अजूनही काही संशयित पोलिसांच्या रडारवर असून, लवकरच त्यांची चौकशी करण्यात येणार असल्याचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांनी स्पष्ट केले आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त ठेवत तपास अधिक तीव्र केला आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!