श्रीरामपूर /प्रतिनिधी :- श्रीरामपूर नगरपालिकेच्या राजकारणात महत्त्वपूर्ण घडामोड घडली असून, भाजपाच्या गटनेतेपदी नगरसेविका सौ. वैशाली दिपक चव्हाण यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. एकीकडे काँग्रेसचे नवनिर्वाचित नगराध्यक्ष करण ससाणे यांचा पदग्रहण सोहळा उत्साहात पार पडत असतानाच, दुसरीकडे भाजपाने आपली संघटनात्मक ताकद दाखवत पालिकेतील नेतृत्व निश्चित केले आहे.
श्रीरामपूर नगरपालिकेत निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेवकांनी एकत्र येत गटनेतेपदासाठी सौ. वैशाली दिपक चव्हाण यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. याबाबतचे अधिकृत पत्र आज जिल्हाधिकारी पंकज आशिया यांना सादर करण्यात आले. या पत्रावर भाजपच्या एकूण दहा नगरसेवकांच्या सह्या असून, अपक्ष नगरसेवक अर्जुन दाभाडे यांनीही या पत्रावर स्वाक्षरी केली आहे. त्यामुळे एकूण अकरा नगरसेवकांच्या पाठिंब्याने सौ. वैशाली चव्हाण यांची भाजप गटनेतेपदी निवड निश्चित झाली आहे.भाजपच्या या निर्णयामुळे पालिकेतील राजकीय समीकरणे अधिक ठळक झाली असून, काँग्रेसला आता कारभार करताना अधिक सजग आणि चाणाक्षपणे पावले टाकावी लागणार आहेत. सौ. वैशाली चव्हाण या अनुभवी, अभ्यासू व आक्रमक भूमिका मांडणाऱ्या नगरसेविका म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली भाजप पालिकेतील विविध विषयांवर ठाम भूमिका घेईल, असा विश्वास पक्षातील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.
विशेष बाब म्हणजे मागील पंचवार्षिक निवडणुकीतही सौ. वैशाली चव्हाण आणि त्यांचे पती दिपक चव्हाण हे दोघेही विजयी झाले होते. यावेळीही दोघांनीही आपले वर्चस्व कायम राखत निवडणूक जिंकली आहे. त्यामुळे चव्हाण दाम्पत्याचा नगरपालिकेतील राजकीय प्रभाव अधिक बळकट झाल्याचे दिसून येते.भाजपकडून गटनेतेपदी निवड झाल्यानंतर नगरसेवक फंड संजय सिद्धार्थ, संजय गांगड, आशिष धनवटे, जयश्री रवि पाटील, दिपक चव्हाण, आशा शशांक रासकर, जितेंद्र छाजेड, स्नेहल केतन खोरे, मनोज लबडे आदी नगरसेवकांनी समाधान व्यक्त केले आहे.श्रीरामपूर नगरपालिकेत पुढील काळात सत्ताधारी काँग्रेस व विरोधी भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत असून, शहराच्या विकासाच्या मुद्द्यांवर कडवी चर्चा व ठोस भूमिका पाहायला मिळणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.




