श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी आता निर्णायक टप्प्यात दाखल होत असताना प्रभाग क्रमांक २ मधील राजकीय गणिताचे काटेकोर समीकरण उलथवणारी घटना घडली आहे. अपक्ष उमेदवार अर्जुन दाभाडे यांना मुस्लिम समाजाकडून जाहीर व प्रभावी पाठिंबा मिळाला आहे. या एकाच घडामोडीने या प्रभागातील राजकीय वातावरणात चांगलीच चुरस निर्माण केली आहे.
दाभाडे यांच्या प्रचारार्थ झालेल्या कॉर्नर सभेत अनवर शाह, असिफ शाह, दादाभाई शेख, नुराभाई शाह, हसन शाह, मुखरण बागवान, दानिश पठाण, सलीम शाह, शाहरुख शाह यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून दाभाडे यांच्या उमेदवारीस पाठिंबा घोषित केला. समाजातील ज्येष्ठ, व्यापारी व तरुणांच्या मोठ्या संख्येने उपस्थितीत हा पाठिंबा औपचारिकरित्या जाहीर करण्यात आला.
अपक्ष उमेदवाराला मिळणारा दिवसेंदिवस वाढता प्रतिसाद पाहता प्रतिस्पर्धी पक्षांच्या गोटात अस्वस्थता निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. मुस्लिम समाजाच्या या एकमुखी भूमिकेमुळे प्रभाग क्र. २ मधील सत्तेचे गणित बदलू शकते, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या समर्थनामुळे निवडणुकीचा कल कोणत्या दिशेने जाणार, कोणते नवे समीकरण तयार होणार आणि अंतिम क्षणी मतदार कोणाकडे झुकतात याकडे शहरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. प्रभाग क्र. २ ची निवडणूक आता केवळ स्पर्धा नसून प्रतिष्ठेचा प्रश्न बनला आहे.




