श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २ मध्ये मोठी राजकीय घडामोड घडली असून, स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांचा भक्कम आधार असलेले पै. अर्जुन दाभाडे यांनी अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यांच्या या निर्णयाने प्रभागातील लढत अधिक चुरशीची होणार असून, अनेक पक्षांच्या गणितात बदल घडवून आणणार असल्याचे राजकीय जाणकारांचे मत आहे.
मागील काही दिवसांपासून दाभाडे कोणत्या पक्षातून रिंगणात उतरणार, याबाबत जोरदार चर्चा रंगत होत्या. शिवाय काही पक्षांनी त्यांना उमेदवारीची ऑफर दिल्याच्याही चर्चा होत होत्या. परंतु सर्व तर्क–वितर्कांना पूर्णविराम देत, स्वतःच्या कार्यकर्त्यांचा आणि सामान्य मतदारांचा विश्वास जपण्यासाठी अपक्ष म्हणूनच लढण्याचा निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे प्रभाग २ मधील मतांचे समीकरण मोठ्या प्रमाणात बदलू शकते, असे संकेत मिळत आहेत.
अर्ज दाखल करताना दाभाडे यांच्या समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. शांत, संयमी आणि सर्वसामान्यांमध्ये सहज मिसळणारे नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे. गेल्या काही वर्षांत प्रभागातील रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरिकांच्या तक्रारी अशा अनेक स्थानिक प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवल्यामुळे त्यांना मतदारांमध्ये चांगली लोकप्रियता मिळाली आहे.
नगरपालिका निवडणुकीत प्रमुख राजकीय पक्ष अद्याप आपापली उमेदवारी निश्चित करत असताना, पै. दाभाडे यांनी अपक्ष मार्ग स्वीकारल्याने अनेक गट-तटांमध्ये मतविभाजनाची शक्यता अधिक वाढली आहे. अशा परिस्थितीत त्यांची उमेदवारी पक्षीय उमेदवारांसाठी आव्हानात्मक ठरणार, हे स्पष्ट झाले आहे.श्रीरामपूरमधील राजकीय वातावरण दिवसेंदिवस तापत असताना, प्रभाग क्रमांक २ मध्ये पै. अर्जुन दाभाडे यांच्या अपक्ष अर्जामुळे नवे समीकरण तयार झाले असून, अंतिम क्षणापर्यंत रोचक घडामोडी घडण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.




