श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरातील राजकीय समीकरणांमध्ये नवा अध्याय लिहिला गेला आहे. भारतीय जनता पक्षाच्या वतीने उत्सव मंगल कार्यालय येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिवाळी फराळ स्नेह मिलन’ या भव्य कार्यक्रमात काँग्रेस पक्षातील अनेक ज्येष्ठ नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश करून शहरातील राजकारणाला नवी दिशा दिली. या प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला असून, भाजपच्या संघटनात्मक बळकटीला नवसंजीवनी मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
या ऐतिहासिक कार्यक्रमास जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदामंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील, भाजप जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर,दिलीप भालसिंग यांच्या सह तालुका व शहर पदाधिकारी, तसेच शेकडो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन दिवाळीच्या पार्श्वभूमीवर ‘स्नेह मिलन’ स्वरूपात करण्यात आले होते.
या सोहळ्यात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायणराव डावखर, शहराच्या पहिल्या महिला नगराध्यक्षा इंदुमतीताई डावखर, रोहन डावखर यांच्यासह त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्याचबरोबर माजी नगरसेविका हेमा गुलाटी, रवींद्र गुलाटी, राजेश अलघ, महाराज कंट्रोल, बंटी गुप्ता आणि त्यांचे कार्यकर्ते यांनीदेखील भाजपचा झेंडा हातात घेतला. या मोठ्या राजकीय प्रवेशामुळे शहरातील काँग्रेसच्या संघटनावर परिणाम होणार असल्याचे निरीक्षकांचे मत आहे.
कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अब्दुल भाई शेख, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, शहराध्यक्ष जितेंद्र छाजेड, महिला शहराध्यक्ष स्वाती चव्हाण यांच्यासह भाजप नेते दीपक पठारे, संजय फंड, बंडूकुमार शिंदे, मारुती बिंगले, श्रीनिवास बिहानी, सतीश सौदागर, रुपेश हरकल, विशाल अंभोरे, महेंद्र पठारे, शरदराव नवले, केतन खोरे, संजय गांगड, आशिष धनवटे, रवी पाटील, दीपक चव्हाण, अर्जुन दाभाडे, वैशालीताई चव्हाण, पूजा चव्हाण, मंजुश्रीताई ढोसावळे, पुष्पा हरदास, अक्षय गाडेकर, महेश सूळ, श्रेयस झिंरगे यांच्यासह असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, भाजप ही सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी कार्य करणारी आणि विकासाचा मार्ग दाखवणारी पक्षसंस्था आहे. श्रीरामपूर शहर आणि तालुक्याच्या विकासासाठी आपण सर्वजण एकदिलाने काम करू. नवीन प्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत आहे. त्यांच्या अनुभवाचा उपयोग विकासकार्यासाठी होईल, असे ते म्हणाले.दिवाळीच्या सणाच्या निमित्ताने आयोजित या स्नेह मिलन कार्यक्रमात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. उपस्थित मान्यवर, कार्यकर्ते आणि नागरिकांनी एकमेकांना शुभेच्छा देत परस्पर स्नेह वृद्धिंगत केला. कार्यक्रमात पक्षात नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. पक्षाच्या विचारधारेवर विश्वास ठेवून सामील झालेल्या कार्यकर्त्यांमुळे पक्षाला निश्चितच नवे बळ मिळेल, असा विश्वास नेत्यांनी व्यक्त केला. सांस्कृतिक रंगतही या कार्यक्रमात होती. जिल्ह्यातील गायक, वादक आणि कलाकारांनी हिंदी व मराठी गीते सादर करून उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. सुरेल मैफलीने संपूर्ण वातावरण रंगून गेले आणि कार्यक्रम अधिक आकर्षक ठरला.
राजकीय विश्लेषकांच्या मते, श्रीरामपूरमधील डावखर परिवार व इतर नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश हा येत्या नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांपूर्वीचा निर्णायक टप्पा ठरू शकतो. काँग्रेसला या प्रवेशामुळे मोठा धक्का बसला असून, भाजपच्या “विकासाभिमुख” राजकारणाला अधिक बळ मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. दिवाळीच्या सणासोबत झालेला हा स्नेह मिलन सोहळा राजकीयदृष्ट्या ‘भाजपच्या बळकटीचा दीपोत्सव’ ठरला आहे, असे अनेकांनी मत व्यक्त केले. श्रीरामपूरच्या राजकीय क्षितिजावर भाजपचा दीप अधिक तेजाने झळकला असून, येत्या काळात या प्रवेशाचा परिणाम स्थानिक राजकारणावर दूरगामी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




