राहाता (प्रतिनिधी): तालुक्यातील निर्मळ पिंप्री (ता. राहाता) येथे पंडित श्री. प्रदीप मिश्रा यांच्या प्रवचनातून सुरू असलेल्या शिवमहापुराण कथेसाठी देशभरातून लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शवली होती. या गर्दीचा फायदा घेत भाविकांच्या मौल्यवान वस्तू, सोन्याचे दागिने, मोबाईल आणि रोकड चोरणाऱ्या टोळ्यांचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. शिर्डी आणि लोणी पोलिसांनी चार दिवसांच्या कालावधीत विविध ठिकाणी केलेल्या कारवाईत एकूण २३ महिला आणि ३ पुरुष असे २६ आरोपी अटक करण्यात आले असून त्यांच्याकडून कटर, ब्लेड, चाकू, वाहन आणि चोरीसाठी वापरलेली साधने जप्त करण्यात आली आहेत.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, उपविभागीय अधिकारी अमोल भारती (शिर्डी विभाग) आणि जयदत्त भवर (श्रीरामपूर विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. शिर्डी, राहाता, लोणी परिसरात ११ ते १५ ऑक्टोबर या कालावधीत पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. तरीही काही टोळ्या भाविकांच्या गर्दीत मिसळून चोरीसाठी सज्ज झालेल्या अवस्थेत सापडल्या.
११ ऑक्टोबर रोजी शिर्डी येथील पंडित प्रदीप मिश्रा यांच्या मिरवणुकीदरम्यान ६ महिलांना पकडण्यात आले. या सर्व महिला उत्तर प्रदेश आणि राजस्थान राज्यातील असून त्यांच्याकडे कटर व ब्लेड मिळाले. गुन्हा गु.र.नं. ९२९/२०२५ अंतर्गत दाखल करण्यात आला त्यानंतर १२ ऑक्टोबर रोजी निर्मळ पिंप्री-लोणी मार्गावरील न्यू इंग्लिश शाळेजवळ १३ जण (१० महिला व ३ पुरुष) दरोडा घालण्याच्या तयारीत असताना लोणी पोलिसांनी पकडले. त्यांच्या ताब्यातून मारुती स्विफ्ट डिझायर (MH-32-AS-5790), शस्त्रे आणि रोकड मिळाली. गुन्हा गु.र.नं. ५५३/२०२५ अंतर्गत दाखल करण्यात आला व १४ ऑक्टोबर रोजी शिर्डी साईबाबा मंदिर परिसरात हरियाणा राज्यातील ६ जणांवर कारवाई झाली. यापैकी २ महिला पकडल्या गेल्या, तर ४ साथीदार गर्दीचा फायदा घेऊन पसार झाले. गुन्हा गु.र.नं. ९३४/२०२५ अंतर्गत दाखल करण्यात आला शेवटी १५ ऑक्टोबर रोजी निर्मळ पिंप्री येथे मुख्य प्रवेशद्वाराजवळ ५ महिला संशयितांना पकडण्यात आले. त्या मध्यप्रदेश व उत्तरप्रदेशातील असून, गुन्हा गु.र.नं. ५५८/२०२५ दाखल करण्यात आला.सर्व आरोपींना नाशिक कारागृहात रवानगी वरील सर्व २६ आरोपींना अटक करून नाशिक मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये बहुतांश महिला असून त्या विविध राज्यांमधून चोरीच्या हेतूने महाराष्ट्रात आल्या असल्याचे स्पष्ट झाले आहे.
शिवमहापुराण कथा सुरू होण्यापूर्वीच पूर्वीच्या ठिकाणी अशा प्रकारच्या चोरीचे प्रकार झाल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पायी पेट्रोलिंग, नाकाबंदी, हॉटेल-लॉज तपासणी,संशयित गुन्हेगारांवर पाळत, आणि सभामंडपाच्या प्रवेशद्वारांवर गणवेशात व नागरी पोशाखातील पोलिस नेमणे अशा सर्वांगीण सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. यामुळे कथा कालावधीत चोरी व दरोड्याचे प्रकार प्रभावीपणे रोखण्यात पोलिसांना यश आले.
याबाबत विशेष बाब अशी की पोलिसांनी पकडलेल्या एका महिला टोळीकडून पंडित प्रदीप मिश्रा यांच्या पुढील दोन वर्षांच्या कथांचे कार्यक्रमाचे तपशील, तारीख, ठिकाण, आयोजन स्थळांची माहिती असलेली डायरी सापडली आहे. या आधारे महाराष्ट्रासह देशभरातील संबंधित पोलिसांना पूर्वसूचना देण्याची तयारी सुरू आहे. या संपूर्ण कारवाईत शिर्डी, लोणी, राहाता, कोपरगाव, संगमनेर, नेवासा, राहुरी, सुपा, आश्वी पोलिस ठाण्यांतील अधिकारी आणि महाराष्ट्र गृह रक्षक दलातील जवानांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
यामध्ये शिर्डी पोलीस निरीक्षक रणजित गलांडे , राहता पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, कोपरगाव पोलीस निरीक्षक संदीप कोळी, संगमनेर पोलीस निरीक्षक प्रविण साळुंके, आश्वी पोलीस निरीक्षक संजय सोनवणे, राहुरी पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, नेवासा पोलीस निरीक्षक महेश पाटील, सुपा पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी तसेच सपोनि वाळके, पोसई सागर काळे, पोसई चौधरी, श्रेपोसई विखे यांनी संयुक्तरित्या कारवाई केली.
या प्रकरणात पोलिसांच्या दक्षतेमुळे मोठ्या प्रमाणात चोरीचे प्रकार रोखले गेले. भाविकांकडून पोलिस प्रशासनाचे कौतुक होत असून, पुढील धार्मिक कार्यक्रमांमध्ये अशाच प्रकारे सुरक्षा उपाय वाढवण्याची मागणीही केली जात आहे. पोलिसांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शिवमहापुराण कथा निर्विघ्न पार पडली आणि भाविकांच्या सुरक्षेचा विश्वास पुन्हा दृढ झाला आहे. चोरीच्या टोळ्यांच्या या मोठ्या जाळ्याचा भंडाफोड करून पोलिसांनी धार्मिक कार्यक्रम सुरक्षिततेच्या दिशेने नवा आदर्श निर्माण केला आहे.




