Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरात मोठी कारवाई : तरुणांना गुंगीकारक औषधांची अवैध विक्री करणारी महिला पोलिसांच्या...

श्रीरामपूरात मोठी कारवाई : तरुणांना गुंगीकारक औषधांची अवैध विक्री करणारी महिला पोलिसांच्या जाळ्यात

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहर पोलिसांनी शनिवारी दुपारी गुप्त माहितीच्या आधारे नॉदर्न ब्रांच परिसरात मोठी कारवाई करत गुंगीकारक व अपायकारक औषधांची अवैध विक्री करणाऱ्या एका महिलेचा पर्दाफाश केला. या कारवाईत शिल्पा बापू शेळके (वय २५, रा. गोंधवणी, श्रीरामपूर) हिला ताब्यात घेण्यात आले असून तिच्याकडून १६ हजार ७४० रुपयांच्या मेफेटरमीन इंजेक्शनच्या ५० बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. या कारवाईमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

दिनांक १६ ऑगस्ट रोजी दुपारी १२.५० वाजता पोलिस निरीक्षक नितीन देशमुख सारे यांनी आपल्या सहकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळालेली माहिती दिली. नॉदर्न ब्रांच येथे लाल टी-शर्ट व पिवळा स्कार्फ घातलेली एक महिला निळ्या रंगाच्या जुपिटर स्कुटीवर येऊन गुंगीकारक औषधांची विक्री करणार असल्याचे समजले. त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे यांच्या मार्गदर्शनाखाली पंचांच्या उपस्थितीत कारवाईचे नियोजन करण्यात आले. पोलिसांनी पंच व औषध निरीक्षक सो. बा. मुळे यांना सोबत घेऊन सापळा रचला. दुपारी साधारण १.५० च्या सुमारास निळ्या रंगाच्या जुपिटरवर सदर महिला आल्यानंतर तिला थांबवण्यात आले. झडती दरम्यान तिच्या स्कुटीच्या डिकीतून ५० सिलबंद बाटल्या (TERMIVA 10 ml.) मेफेटरमीन इंजेक्शन मिळून आल्या. औषध निरीक्षकांनी तपासणी केली असता ही औषधे ‘H’ प्रकारातील असल्याचे स्पष्ट झाले. याचा अर्थ ही औषधे डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय विक्री करता येत नाहीत व त्याचा चुकीचा वापर केल्यास गंभीर आरोग्य परिणाम होऊ शकतो.

पोलिसांनी केलेल्या चौकशीत शिल्पा शेळके हिच्याकडे कोणताही औषध विक्री परवाना नसल्याचे आढळले. तसेच ती ही औषधे परवानगीशिवाय ऑनलाइन खरेदी करून विना बिलाने बाजारभावापेक्षा दुप्पट दराने विक्री करत असल्याचे निष्पन्न झाले. एका बाटलीची किंमत ३३४ रुपये असताना ती ७०० रुपयांना विकली जात असल्याची माहिती तिने दिली. तसेच ही औषधे ती आपल्या मित्र गणेश मुंडे (रा. स्वप्ननगरी, गोंधवणी) यांच्या मदतीने स्थानिक जीममध्ये व्यायाम करणाऱ्या तरुणांना व इतर ग्राहकांना विकत असल्याचेही कबूल केले. मेफेटरमीन इंजेक्शनचा वैद्यकीय उपयोग रक्तदाब कमी झाल्यास केला जातो. मात्र या औषधांचा गैरवापर शरीराची क्षमता वाढविण्यासाठी केला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. औषध निरीक्षक मुळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या इंजेक्शनचा चुकीचा वापर केल्यास झोप येणे (drowsiness), भास (hallucinations), आकडी (convulsions) असे गंभीर दुष्परिणाम होऊ शकतात. यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला व जिवितास गंभीर धोका निर्माण होतो.

या प्रकरणी शिल्पा शेळके व तिचा साथीदार गणेश मुंडे या दोघांविरुद्ध गुरनं. ७५७/२०२५ अन्वये BNS 2023 चे कलम १२३, १२५, २७८ प्रमाणे सरकारतर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या औषधांपैकी काही नमुने तपासणीसाठी शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत.या कारवाईमुळे श्रीरामपूरात अवैध औषध विक्रीच्या टोळ्यांचे धाडस वाढत असल्याचे स्पष्ट झाले असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक दीपक मेढे हे करीत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
clear sky
12.1 ° C
12.1 °
12.1 °
48 %
1.6kmh
0 %
Tue
29 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!