श्रीरामपूर प्रतिनिधी :- शहरातील गाजत असलेल्या ॲट्रॉसिटी प्रकरणात भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी नगरसेवक प्रकाश चित्ते यांना अखेर मोठा दिलासा मिळाला असून, श्रीरामपूर सत्र न्यायालयाने त्यांना आज मंगळवारी अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. त्यांच्या वतीने ऍड. बाबा औताडे आणि ऍड. खंडागळे यांनी युक्तिवाद केला होता. या प्रकरणात चित्ते यांच्यावर मुल्ला उर्फ समीर कटर या गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या आरोपीविरोधात न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीदरम्यान, फिर्यादी महिलेला धमकावल्याचा गंभीर आरोप ठेवण्यात आला होता. याप्रकरणी फिर्यादी महिलेने श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रकाश चित्ते आणि मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी यांच्यावर अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याला त्वरित राजकीय व सामाजिक वळण मिळाले. अनेकांनी या तक्रारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सदर गुन्हा खोटा आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप केला. याच पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय शिष्टमंडळाने संबंधित गुन्हा मागे घेण्यात यावा, अशी ठाम मागणी प्रशासनाकडे केली होती. दरम्यान, चित्ते यांच्या कुटुंबीयांनी थेट राज्याचे मुख्यमंत्री व गृहराज्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत, या प्रकरणात सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी सादर केली होती. परिणामी, राज्य पातळीवरूनही या प्रकरणाकडे गांभीर्याने पाहिले जाऊ लागले होते. प्रकाश चित्ते यांनी अटक होण्याच्या शक्यतेमुळे तत्काळ सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. काल झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायमूर्ती देशपांडे यांनी सर्व बाबींचा विचार करून चित्ते यांना अटकपूर्व जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे चित्ते यांचे समर्थक आणि भाजपामध्ये समाधान व्यक्त केले जात असून, पुढील काळात न्यायालयीन लढाईत आपली बाजू स्पष्टपणे मांडली जाईल, असे चित्ते यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले.
या प्रकरणामुळे संपूर्ण श्रीरामपूरमध्ये काही दिवसांपासून प्रचंड राजकीय खळबळ उडाली होती. सामाजिक संघटनांनी आणि राजकीय कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावरून प्रतिक्रिया व्यक्त करत आपापले समर्थन वा विरोध नोंदवले होते. मात्र आता न्यायालयाकडून मिळालेल्या दिलासादायक निर्णयामुळे परिस्थिती काहीशी निवळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. भविष्यात या प्रकरणाचा निकाल काय लागतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. अद्याप गुन्हा मागे घेण्यात आलेला नसल्याने चित्ते यांना न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. मात्र अटक होण्याची भीती टळल्यामुळे त्यांच्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीला थोडा श्वास मिळाला आहे. दरम्यान, पोलिस विभागाकडून या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र सदर गुन्हा खरोखरच तक्रारीप्रमाणे गंभीर स्वरूपाचा आहे का, किंवा त्यामागे कोणती राजकीय पार्श्वभूमी आहे का, याबाबत पोलिसांकडून अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही.