श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्याच्या सामाजिक कल्याण क्षेत्रात महत्त्वाचा टप्पा ठरावी अशी नियुक्ती नुकतीच झाली असून, तालुक्यातील संजय गांधी निराधार योजना समितीच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ नेते आणि माजी जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही घोषणा श्रीरामपूरचे माजी खासदार खा. डॉ. सुजय विखे यांनी अशोकनगर येथे आयोजित कार्यक्रमात अधिकृतरित्या केली. या निर्णयाने तालुक्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चैतन्य निर्माण झाले आहे.
राज्याचे महसूल मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे खंदे समर्थक म्हणून परिचित असलेले शरद नवले हे गेल्या अनेक वर्षांपासून समाजातील वंचित, गरजू आणि दुर्बल घटकांसाठी सक्रियपणे कार्यरत आहेत. त्यांच्या संयमी आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे, अशी प्रतिक्रिया कार्यकर्त्यांमधून उमटत आहे. शरद नवले यांचा सामाजिक कामाचा प्रदीर्घ अनुभव लक्षात घेता, त्यांची ही नियुक्ती अत्यंत योग्य असल्याचे मत विविध स्तरांतून व्यक्त होत आहे. निराधार, वृद्ध, अपंग, विधवा, परितक्त्या महिला अशा गरजूंना शासनाच्या विविध योजना प्रभावीपणे मिळाव्यात यासाठी नवले यांनी आजवर मोठे योगदान दिले आहे. त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदाच्या कालावधीत ही योजना अधिक परिणामकारकरित्या राबवली जाईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
खा. सुजय विखे यांनी कार्यक्रमात बोलताना सांगितले की, शरद नवले यांच्या नेतृत्वाखाली संजय गांधी निराधार योजना ही फक्त कागदावर न राहता, प्रत्यक्षात गरजूंना लाभ देणारी ठरेल. त्यांच्या अनुभवाचा फायदा निश्चितच लाभार्थ्यांपर्यंत योजनांची योग्य अंमलबजावणी करण्यासाठी होणार आहे. या नियुक्तीमुळे तालुक्यातील गोरगरीब, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना शासकीय योजनांचा लाभ अधिक सुलभपणे मिळेल, अशी आशा नागरिकांनी व्यक्त केली आहे. विशेषतः ग्रामीण भागातील निराधारांना आधार मिळवून देण्यासाठी नवले यांचे मार्गदर्शन उपयुक्त ठरेल, असा विश्वास सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. नवले यांच्या अध्यक्षपदाच्या निमित्ताने संजय गांधी निराधार योजनेचे कार्य अधिक गतिमान होईल, गरजूंना घरपोच सेवा मिळेल आणि शासकीय मदतीचा खराखुरा उपयोग होईल, अशी व्यापक अपेक्षा तालुक्यातील जनतेत निर्माण झाली आहे. त्यांच्या नियुक्तीने संपूर्ण श्रीरामपूर तालुक्यात सामाजिक कल्याणाच्या कार्याला नवा उजाळा मिळेल, हे निश्चित असल्याचे जाणकारांचे मत आहे.