श्रीरामपूर (प्रतिनिधी): शहरात सध्या चर्चेचा विषय ठरलेले प्रकाश चित्ते प्रकरण आता अधिकच गुंतागुंतीचे स्वरूप घेत असून, या प्रकरणातून उफाळून आलेल्या आरोप-प्रत्यारोपांमुळे श्रीरामपूरचे राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. एका दलित महिलेवर अत्याचार प्रकरणातील साक्ष बदलण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोप प्रकाश चित्ते यांच्यावर झाल्यानंतर, त्यासंदर्भातील एक कथित ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल झाली. त्यानंतर चित्ते यांच्यावर अॅट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला.
याच घटनेनंतर चित्ते यांच्या अटकेसंदर्भात वृत्त प्रसिद्ध केल्यामुळे पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाला असल्याची तक्रारही नोंदविण्यात आली. या घडामोडींमुळे आधीच खळबळ माजलेली असताना, आता चित्ते समर्थक आणि भाजप नेते सुनील मुथ्था यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत खेमनर यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर हा वाद आणखी पेट घेत आहे. खेमनर यांनीही मुथ्था यांच्या आरोपांना सडेतोड प्रत्युत्तर देत तीव्र प्रतिहल्ला केला आहे.
सुनील मुथ्था यांनी आरोप केला की, खेमनर हे तोतया पत्रकार असून त्यांनीच प्रकाश चित्ते यांच्यावर खोटा अॅट्रोसिटी गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी स्वतः पत्रकार असल्याचे दाखवून खंडणी उकळली असून, त्यांच्याकडे कोणतीही अधिकृत पत्रकार नोंदणी नसल्याचा दावा मूथा यांनी केला. एवढेच नव्हे तर श्रीरामपूर, नेवासा, कोपरगाव आणि राहुरी या पोलीस ठाण्यांमध्ये खेमनर यांच्याविरोधात बलात्कार, दंगल आणि खंडणी यांसारखे गंभीर गुन्हे दाखल असल्याचेही मुथ्था यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. त्याचप्रमाणे, खेमनर हे भाजपचे जिल्हा प्रतिनिधी असल्याचा दावा केला जात असला, तरी त्यांच्या नावावर कोणतेही नियुक्तीपत्र उपलब्ध नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. पत्रकार संरक्षण कायद्याचा दाखल देऊन खेमनर संरक्षण मागत असले तरी, असा कोणताही कायदा अस्तित्वात नसल्याचेही मुथ्था यांनी ठामपणे सांगितले.
या आरोपांवर खेमनर यांनी तत्काळ प्रतिक्रिया देत सर्व आरोप फेटाळून लावले. जर प्रकाश चित्ते यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असता, तर ते आजतागायत फरार का आहेत? असा प्रतिप्रश्न करीत त्यांनी प्रकाश चित्तेंवर केलेले आरोप अधिक ठाम केले. माझे स्वतःचे दैनिक असून, मी अधिकृतरीत्या पत्रकार संघटनेचा सदस्य आहे. माझ्याकडे सर्व आवश्यक नोंदणीपत्रे आहेत. त्यामुळे मला ‘तोतया पत्रकार’ म्हणण्याचा अधिकार मुथ्था यांना नाही,” असे स्पष्ट करत त्यांनी मुथ्था यांच्यावरही थेट आरोप केले. खेमनर यांनी सांगितले की, त्यांच्या विरोधात दाखल गुन्हे हे सामाजिक कार्य करत असताना राजकीय द्वेषातून घडवून आणलेले आहेत. काही प्रकरणांमध्ये न्यायालयाने त्यांना निर्दोष ठरवले असल्याचेही त्यांनी सांगितले.
तसेच, खेमनर यांनी पलटवार करत सुनील मुथ्था यांच्यावर खुनाच्या गुन्ह्यापासून ते पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्ह्यांचे आरोप केले. माझ्यावर आरोप करणाऱ्या मूथा यांच्यावरच गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे, असे सांगत त्यांनी मुथ्था यांची विश्वासार्हता संशयाच्या भोवऱ्यात आणली. पत्रकार संरक्षण कायद्याच्या मुद्द्यावर बोलताना, खेमनर यांनी सांगितले की, 2017 मध्ये महाराष्ट्र शासनाने हा कायदा अस्तित्वात आणला असून, मुथ्था यांना याची माहिती नसणे म्हणजे त्यांचे अज्ञान आहे. पक्षाच्या नियुक्तीपत्रासंदर्भात खेमनर यांनी भाजपचे तत्कालीन जिल्हाध्यक्ष लंघे यांचे अधिकृत पत्र दाखवले असल्याचा दावा केला.
या आरोप-प्रत्यारोपांमुळे मूळ अॅट्रोसिटी प्रकरण आणि त्यानंतर झालेला हल्ल्याचा प्रयत्न दोन्ही विषय बाजूला पडत चालले आहेत. श्रीरामपूर शहरात दोन्ही गटांचे समर्थक समाजमाध्यमांवर एकमेकांवर टीका करत असून, त्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले आहे. पोलिसांसाठी देखील आता हा तपास अधिक गुंतागुंतीचा झाला असून, मूळ गुन्ह्याच्या तपासासोबतच या वादग्रस्त विधानांच्या पार्श्वभूमीवर नवीन दाव्यांची पडताळणी करणे आवश्यक झाले आहे. सध्या शहरात या प्रकरणामुळे मोठी अस्वस्थता असून, राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चित्ते, मुथ्था व खेमनर यांच्या भूमिकेवर वेगवेगळ्या चर्चा झडत आहेत. पोलिसांकडून मूळ गुन्ह्याचा आणि हल्ल्याचा तपास सुरु असला तरी या नवीन वादामुळे तपासाची दिशा बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलीस प्रशासन या वादांमध्ये नेमकी भूमिका घेणार की नव्या राजकीय हस्तक्षेपामुळे गुन्हा झाकोळला जाणार, याकडे संपूर्ण श्रीरामपूरवासीयांचे लक्ष लागले आहे.