श्रीरामपूर (प्रतिनिधी) — शहरात भाजपचे मा. नगरसेवक तथा मा. नगरसेविका यांच्या पती असलेल्या दीपक चव्हाण यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतर केवळ २४ तासांच्या आत शहर पोलिसांनी धडक कारवाई करत पाच संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात यश मिळवलं आहे. गाडीला कट मारण्याच्या किरकोळ कारणावरून झालेल्या या हल्ल्यामुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, पोलिसांनी तातडीने दिलेली कारवाईमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
शनिवारी रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास माजी नगरसेवक दीपक चव्हाण हे आपल्या वाहनाने प्रवास करत असताना, त्यांनी एका तरुणाच्या दुचाकीला कट मारल्याचे सांगण्यात येते. त्याच रागातून काही तरुणांनी चव्हाण यांचा पाठलाग करत किशोर चित्रपटगृहासमोर त्यांना अडवले आणि बेदम मारहाण केली. या हल्ल्यात चव्हाण यांच्या डोक्याला, पाठीला व हाताला गंभीर दुखापत झाली. त्यांना तात्काळ शहरातील ओगले रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. सदर प्रकारामुळे राजकीय व सामाजिक स्तरावर संतापाची लाट उसळली होती. हल्ल्यानंतर शहर पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक सक्रीय झाले. सीसीटीव्ही फुटेज तसेच गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी डावखर रोड व मोरगे वस्ती येथील पाच संशयित आरोपी – अरबाज शेख, हुजेब शेख, समीर शेख, आकाश चौगुले व लक्ष्मण साबळे यांना अटक केली. या सर्वांची चौकशी सुरु असून, हल्ल्यामागील अधिक तपशील उघड होण्याची शक्यता आहे.
श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांनी ही माहिती दिली. या प्रकरणातील कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तसेच उपविभागीय अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. ही कारवाई पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वात गुन्हे शोध पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल संपत बडे, अमोल पडोळे, संभाजी खरात, मच्छिंद्र कातखडे, अजित पटारे, सचिन काकाडे, सचिन दुकळे, संतोष कराळे, सांगर बनसोडे, आजिनाथ आंधळे, रामेश्वर तारडे आणि महिला पोलीस कॉन्स्टेबल मिरा सरग यांच्या संयुक्त पथकाने राबवली.
मारहाण प्रकरणातील जलद कारवाईमुळे पोलीस प्रशासनाचे सर्वत्र कौतुक होत असून, श्रीरामपूर शहरातील कायदा-सुव्यवस्थेसाठी पोलिसांच्या तत्परतेचा पुन्हा एकदा प्रत्यय आल्याचे नागरिकांकडून म्हटले जात आहे. या प्रकरणातील पुढील तपास सुरु असून, पोलिसांनी हल्ल्यामागे अन्य कोणतीही पार्श्वभूमी असल्यास ती उघड करण्याच्या दृष्टीने तपासाची व्याप्ती वाढवली आहे. दरम्यान, जखमी माजी नगरसेवक चव्हाण यांची प्रकृती सध्या स्थिर असून, त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत.