श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरात गाजलेल्या ‘मुल्ला कटर’ प्रकरणातील बलात्कार पीडित मागासवर्गीय मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतलेल्या भाजप उत्तर नगर जिल्हा सचिव दत्ताभाऊ खेमनर यांच्यावर सकाळी प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे. हल्ल्याचा आरोप प्रकाश चित्ते यांच्यावर करण्यात आला असून, या घटनेनंतर श्रीरामपूर शहरातील वातावरण तणावपूर्ण बनले आहे.
सकाळी साडेदहा वाजेच्या सुमारास खेमनर हे त्यांच्या गाडीची वॉशिंग करण्यासाठी बेलापूर रस्त्यावरील कमानीजवळील कार वॉश सेंटरवर थांबले असताना, सात ते आठ अज्ञात युवकांनी मोटारसायकलवर येत त्यांच्यावर बेसबॉलच्या दांडक्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र प्रसंगावधान राखून खेमनर यांनी आपला जीव वाचवला. परिसरात लोकांची गर्दी जमल्याने हल्लेखोर तातडीने पळून गेले. खेमनर यांनी याआधी शहरातील बलात्कार प्रकरणातील आरोपी प्रकाश चित्ते याच्या अटकेसाठी अतिरिक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्याकडे निवेदन दिले होते. या मागणीमुळेच चित्ते यांनी राग मनात धरूनच हा हल्ला घडवून आणल्याचा खेमनर यांचा आरोप आहे. त्यांनी म्हटले की, “माझ्यावर दोन दिवसांपासून नजर ठेवली जात होती. आज मला एकटं पाहून हल्ल्याचा कट रचण्यात आला. सदर प्रकरणात प्रकाश चित्ते याच्यावर अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (ॲट्रॉसिटी), धमकी व जातीवाचक शिवीगाळ यासह गंभीर गुन्हे दाखल आहेत. तो सध्या फरार असून पोलिसांच्या हातावर तुरी देत आहे.
या हल्ल्यानंतर भाजप नेते दीपक पटारे, मनोज भिसे, अभिजित लिप्टे आदी पदाधिकाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यात पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांची भेट घेत खेमनर यांना तातडीने पोलीस संरक्षण देण्याची मागणी केली. तसेच चित्ते व त्यांच्या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळीचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणीही जोर धरत आहे. शहरात अनेक तक्रारींमध्ये प्रकाश चित्ते हे गोरगरिबांना सावकारी स्वरूपात पैसे देऊन त्यांची घरे, वाहने, जमिनी बळकवत असल्याचा आरोप आहे. अशा व्यक्तींकडून थेट भाजपसारख्या पक्षाच्या जिल्हा सचिवावर हल्ला होणे ही गंभीर बाब असून त्यामुळे संपूर्ण श्रीरामपूर शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. दरम्यान, रात्री उशीरापर्यंत या हल्ल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलिसांकडून तत्काळ आणि कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. खेमनर समर्थकांनी पोलीस ठाण्याबाहेर मोठी गर्दी केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या संपूर्ण प्रकरणाकडे नागरिक, राजकीय वर्तुळ आणि प्रशासकीय यंत्रणा लक्ष ठेवून आहेत.