श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील मेनरोडवरील ‘रामभाऊ सोपान नागरे ज्वेलर्स’ या सराफा दुकानातील घरफोडी प्रकरणी मोठी कारवाई करत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना येथे शोध मोहीम राबवून चार आरोपींना अटक केली आहे. या आरोपींकडून पोलिसांनी ११ किलोहून अधिक चांदीचे दागिने, 4 ग्रॅम सोन्याच्या दागिन्यांसह एकूण १४ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला असून, या टोळीतील एकावर यापूर्वी १४ गुन्हे नोंद असल्याची माहिती आहे.
१७ जुलै २०२५ रोजी रात्री ८.३० च्या सुमारास फिर्यादी निखील विजय नागरे (वय ३४) हे आपले दुकान बंद करून घरी गेले होते. दरम्यानच्या काळात अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे शटर तोडून कपाट व ड्रॉवरमधील सोन्या-चांदीचे दागिने, लगड असा एकूण २६,५९,७४५ रुपयांचा ऐवज चोरीला लावला होता. या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गु.र.नं. ६८१/२०२५ नुसार भारतीय दंड विधानातील बीएनएस कलम ३०५(अ), ३३१(४) अंतर्गत घरफोडीचा गुन्हा नोंदविण्यात आला होता त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेला गुन्हा उघडकीस आणण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. यानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई अनंत सालगुडे, अंमलदार बाळासाहेब गुंजाळ, सुनिल मालणकर, भगवान थोरात, रमीजराजा आत्तार, अमृत आढाव, फुरकान शेख, प्रशांत राठोड व महादेव भांड यांचे विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकाने घटनास्थळी भेट देऊन सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने पाहणी केली. तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे हा गुन्हा जालना येथील गोपीसिंग टाक, शिवाजी सासनिक व त्यांच्या साथीदारांनी केल्याचे निष्पन्न झाले.
यानंतर २२ जुलै रोजी पोलीस पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे जालना तालुका पोलीस स्टेशन येथे स्थानिक पोलीस अधिकारी पोहेकॉ. दत्तात्रय मेहत्रे यांच्या मदतीने शोधमोहीम राबवण्यात आली. या मोहिमेत गोपीसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २५), दिपकसिंग प्रल्हादसिंग टाक (वय २८) दोघेही रा. सिद्धार्थनगर, ता. व जि. जालना, मुळ रा. शिकलकरी मोहल्ला, टाक हाऊस, शिवाजी प्रल्हादराव सासनिक (वय ३६) – रा. गांधीनगर, जालना, अमित नंदलाल दागडिया (वय ३२) – रा. हरीगोविंदनगर, जालना यांना अटक करण्यात आले तपासा दरम्यान आरोपी गोपीसिंग टाक याने गुन्ह्याची कबुली दिली. त्याने आपल्या साथीदारांसह होंडा कंपनीच्या कारमधून श्रीरामपूर येथे येऊन सदर दुकान फोडल्याचे मान्य केले. अटक केलेल्या आरोपींकडून पोलिसांनी ११ किलो २३० ग्रॅम चांदीचे दागिने व लगड, ४ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, ५ मोबाईल फोन,होंडा सिटीझेड एक्स कार (MH-03-AZ-5458) असा एकूण १४,०७,००० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला
विशेष बाब म्हणजे आरोपी दिपकसिंग टाक याच्यावर जालना जिल्ह्यात दरोडा, घरफोडी, चोरीचे एकूण १४ गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले आहे. सर्व आरोपींना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे आणून पुढील तपासासाठी हजर करण्यात आले असून, ही संपूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, व उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीरामपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नितीन देशमुख हे करीत आहेत.