श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर व राहाता तालुक्याच्या सीमेवर असलेल्या टिळकनगर इंडस्ट्रीजमुळे परिसरातील नागरिकांना मळीयुक्त दूषित पाण्याचा त्रास सहन करावा लागत असल्याचा गंभीर मुद्दा श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले यांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात ठामपणे मांडला. मात्र त्यांच्या विधानाचा विपर्यास करत काही स्थानिक राजकीय पुढाऱ्यांनी ‘टिळकनगर कंपनी बंद करण्याची मागणी करण्यात आली’ असा अपप्रचार सुरू केल्याने राजकीय वातावरण चिघळले असून, परिसरात आंदोलनाचे वारे जोर धरू लागले आहेत.
आमदार ओगले यांनी विधानसभा सभागृहात बोलताना स्पष्टपणे नमूद केले की, “टिळकनगर इंडस्ट्रीज पिण्यायोग्य पाणी पुरवत असली तरी, त्याच वेळी कारखान्यातून बाहेर पडणारे सांडपाणी अत्यंत मळीयुक्त आहे. हे पाणी ना जनावरांसाठी उपयुक्त आहे, ना शेतीसाठी. परिणामी, परिसरातील नागरिकांना अनेक आरोग्यसंकटांना सामोरे जावे लागत असून, शेतकरी वर्गाचेही मोठे नुकसान होत आहे. त्यांच्या या विधानावरून काही विरोधी गटांनी “टिळकनगर इंडस्ट्रीज बंद करा” अशी मागणी झाल्याचा आक्षेपार्ह प्रचार सुरु केला. त्यामुळे या विधानाचे स्वरूप पूर्णपणे विपरित दिशेने वळवले गेले असून, त्याच्या निषेधार्थ काही स्थानिक नेत्यांनी ‘जोडो मारो’ आंदोलन, रस्ता रोको आंदोलन, निषेध सभा अशा प्रकारच्या आंदोलक कृतीला सुरुवात केली आहे. या घडामोडींमुळे टिळकनगर, दत्तनगर आणि परिसरात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार ओगले यांनी तात्काळ खुलासा देत म्हटले, मी केवळ दूषित पाण्यामुळे त्रस्त नागरिक आणि बाधित शेतकऱ्यांच्या व्यथा विधानसभेत मांडल्या आहेत. मी कधीही कंपनी बंद करण्याची मागणी केलेली नाही. उलट, कंपनीने आपल्या सामाजिक उत्तरदायित्वाचे भान ठेवून या समस्यांकडे गांभीर्याने पाहावे आणि उपाययोजना कराव्यात, हीच माझी भूमिका आहे.
ओगले यांच्या या स्पष्ट भूमिकेला स्थानिक शेतकरी व नागरिकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. दूषित पाण्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून शेतीचे नुकसान होत असल्याची खंत व्यक्त करत, आजवर आमच्या समस्या कोणीही विधानसभेत मांडल्या नव्हत्या, ओगले हे पहिले नेते आहेत ज्यांनी आमच्या वेदना शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत,” अशा शब्दांत शेतकऱ्यांनी त्यांच्या भूमिकेचे स्वागत केले. काही शेतकऱ्यांनी तर त्यांना “शेतकऱ्यांचा खरा आवाज” अशी उपाधी देत जोरदार पाठिंबा दिला आहे. दरम्यान, या विषयावरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले असून, ज्यांनी जनतेच्या बाजूने उभे राहायचे होते, तेच आता राजकारण करून आंदोलनांच्या माध्यमातून आपली पोळी भाजत आहेत,” अशी संतप्त प्रतिक्रिया अनेक नागरिकांनी दिली. सामाजिक माध्यमांवरही या मुद्द्यावरून तीव्र चर्चा सुरु असून, अनेकांनी आमदार ओगले यांचे विधान ऐकून घेण्याची आणि गैरसमज न पसरवण्याची मागणी केली आहे. सद्यस्थितीत टिळकनगर परिसरात आंदोलनाचे वातावरण असले तरी, नागरिकांचे लक्ष आता या समस्येच्या मूळ कारणावर उपाययोजना कशा होतात याकडे लागले आहे. प्रशासनाकडूनही या तक्रारींची चौकशी करण्याची शक्यता असून, संबंधित कंपनीनेही याबाबतीत अधिक खुलासा करावा अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.