Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरबलात्कारप्रकरणी साक्ष थांबवण्यासाठी महिलेला धमकी; प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्यावर अनुसूचित...

बलात्कारप्रकरणी साक्ष थांबवण्यासाठी महिलेला धमकी; प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्यावर अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – बलात्काराच्या गुन्ह्यात साक्ष देऊ नये म्हणून पुण्यात वास्तव्यास असणाऱ्या पीडित महिलेला श्रीरामपूर येथे दमदाटी करत, जातीवाचक शिवीगाळ करून जिवे ठार मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी या दोन व्यक्तींविरोधात अनुसूचित जाती आणि जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा तसेच भारतीय न्याय संहिता 2023 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी पीडित महिला (वय 20 वर्षे) मूळची श्रीरामपूर व सध्या पुण्यातील अंबड लिंक रोड, शिवाजीनगर येथे राहणारी आहे. तिने मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह चालवताना श्रीरामपूर येथील राहिवासी असलेल्या मुल्ला कटर या इसमाविरुद्ध सन 2022 मध्ये बलात्काराचा गुन्हा (गु.र.नं. 666/2022) दाखल केला होता. सदर गुन्ह्याची सुनावणी सध्या मा. जिल्हा व सत्र न्यायालय, श्रीरामपूर येथे सुरू आहे. पीडित महिला कामानिमित्त श्रीरामपूरमध्ये अधूनमधून येत असते. अशाच एका दौऱ्यात, सुमारे 8-10 दिवसांपूर्वी ती श्रीरामपूरहून पुण्याकडे परतत असताना, नेवासा रोडवरील बोगद्यानजीक प्रकाश चित्ते या ओळखीच्या इसमाने तिला थांबवले. त्याने पीडित महिलेला धमकावत सांगितले की, “तू कोर्टात मुल्ला कटर निर्दोष आहे असे सांग. तो माझा कार्यकर्ता आहे. जर तसं केलंस तर तुला 2 लाख रुपये देईन. नाकारलंस तर तुला कुठे संपवलं जाईल कळणारही नाही.” इतक्यावरच न थांबता, पुढील वेळी मुल्ला कटरचा भाऊ तुला भेटून 50 हजार रुपये देईल, असेही त्याने स्पष्टपणे सांगितले.

यानंतर, दिनांक 15 जुलै 2025 रोजी साक्षीसाठी ती श्रीरामपूर कोर्टात येण्यासाठी पुण्याहून निघाली. नेवासा फाट्यावर रात्रभर मुक्काम करून सकाळी ती लॉजवर थांबली असताना आरोपी मुल्ला कटरचा भाऊ रिजवान कुरेशी तिला भेटला. त्याने तिला गुपचुप श्रीरामपूर न्यायालयात नेले आणि एका वकिलासमोर कोऱ्या कागदावर तिची सही व अंगठा घेतले. त्यानंतर कोर्टातून बाहेर पडल्यावर बसस्थानकावर परत जात असताना रिजवान कुरेशी तिचा पाठलाग करत असल्याचे तिच्या लक्षात आले. ती रिक्षातून नेवासा रोडच्या दिशेने जात असताना रेल्वे उड्डाण पुलाजवळ रिजवानने रिक्षा थांबवून तिला पुन्हा धमकावले. त्याने म्हटले, “जर तू आमच्या बाजूने साक्ष दिलीस तर तुला 2 लाख रुपये मिळतील. लगेच 50 हजार घे. पण जर साक्ष दिलीस तर तुला संपवून टाकू.” त्याचवेळी तो जातीवाचक अपमान करत म्हणाला, “तसंच तुमच्या म्हारड्यांना कोणी तुकडा टाकत नाही. तुमची लायकी काय आहे!

रिजवान याच्या धमकीच्या वेळी त्या ठिकाणी पीडितेचा ओळखीचा मनोज साबळे हा पोहोचला. त्याने परिस्थिती पाहताच पीडितेला धीर दिला. त्यानंतर ती थेट श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात पोहोचली व प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्या विरोधात तक्रार दाखल केली. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. नं. 678/2025 प्रमाणे प्रकाश चित्ते व रिजवान कुरेशी यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) 2023 चे कलम 232 कलम 126(2),कलम 351(2)कलम 49 तसेच अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा 1989 अंतर्गत कलम 3(1)(r) व 3(1)(s)कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असून, प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याने आरोपींना लवकरात लवकर अटक व्हावी, अशी मागणी सामाजिक क्षेत्रातून होत आहे.

या संपूर्ण प्रकारातून बलात्कार पीडितेवर साक्ष बदलण्यासाठी केवळ धमकीच नव्हे तर आर्थिक आमिषही दिले जात असल्याचा आरोप स्पष्टपणे समोर येत आहे. आरोपींच्या पाठराखणासाठी राजकीय कार्यकर्त्यांचा वापर होत असल्याचेही या प्रकरणावरून सूचित होते. पीडित महिला ही अनुसूचित जातीमधील असल्याने, तिच्यावर जातीय दुजाभाव करत अपमानास्पद वागणूक देण्यात आली, हेही विशेष लक्षवेधी आहे. या प्रकरणात पीडितेला न्याय मिळण्यासाठी तसेच आरोपींवर कठोर कारवाई व्हावी, याकरिता समाजातील प्रबुद्ध व्यक्तींनी एकत्र येत पोलिस प्रशासनाने निष्पक्ष तपास करावा व आरोपींना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे. या प्रकारामुळे साक्षीदार महिलांवर होणाऱ्या दबावांची दाहकता पुन्हा एकदा उजेडात आली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!