श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण समजल्या जाणाऱ्या दत्तनगर एमआयडीसी परिसरात नुकतेच महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रिसिटी ट्रान्समिशन कंपनी लिमिटेडच्या २२०/३३ के.व्ही. क्षमतेच्या उपकेंद्राचे भूमिपूजन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पार पडले. या भूमिपूजनानंतर मात्र एक वेगळीच दृश्ये दत्तनगरमध्ये पाहायला मिळाली. स्थानिक राजकारणातील कट्टर विरोधक म्हणून ओळखले जाणारे विविध पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते एकाच ठिकाणी एका चहाच्या टपरीवर ‘चाय पे चर्चा’ करताना दिसून आले. ‘भाजपाचे भजे, काँग्रेसचा चहा आणि मित्र पक्षांचे पाणी…’ अशा मिश्किल शैलीत रंगलेल्या चर्चेचा विषय मात्र होता गंभीर – तालुक्याचा विकास, विद्युत व्यवस्था, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि एकमेकांवरील टोलेबाजी! या चर्चासत्रात आमदार हेमंत ओगले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नानासाहेब शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी सभापती बाबा दिघे, जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, रिपब्लिकन पक्षाचे भीमा बागुल, चांगदेव ढोकचौळे, बाबासाहेब ढोकचौळे, सुभाष गायकवाड, प्रेमचंद कुंकूलोळ यांच्यासह भाजप, काँग्रेस, रिपाइं आणि इतर पक्षांचे दोन अंकी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
एकमेकांवर कठोर टीका करणारे हे नेते एका चहाच्या कपावर चर्चा करताना दिसल्याने सामान्य ग्रामस्थ आश्चर्यचकित झाले. परिसरातून जाणाऱ्या नागरिकांनीही ही एकी पाहून आश्चर्य व्यक्त केलं. विशेष म्हणजे, यावेळी उपस्थित एका सामाजिक कार्यकर्त्याने स्पष्ट प्रतिक्रिया देताना सांगितले की, “गावात आणि वॉर्डात एकमेकांविरोधात द्वेषाचे राजकारण करणारे हेच नेते एकत्र बसून हसत-खेळत गप्पा मारतायत, हे पाहून मन हेलावून गेले.” त्यांनी पुढे सांगितले की, “राजकीय वैर नसावं ही आमची इच्छा आहे. मात्र सत्तेसाठी आमच्यात तेढ निर्माण केली जाते, याचं दुःख वाटतं. एकत्र आलात तर स्वागतच – पण विकासावर एकत्र येण्याची गरज आहे.”
या भूमिपूजन सोहळ्यात पालकमंत्री डॉ. विखे पाटील यांनी भाषणात स्पष्ट केलं की, “एमआयडीसीमधील २२०/३३ के.व्ही. क्षमतेच्या विद्युत केंद्रामुळे संपूर्ण श्रीरामपूर तालुका आणि लगतच्या भागांना स्वतंत्र उपकेंद्रामधून अखंड विद्युत पुरवठा मिळणार आहे. यापूर्वी अशा अडचणी येत असत की, बाभळेश्वर विद्युत केंद्राशी संपर्क साधल्याशिवाय वीजपुरवठा सुरळीत होत नव्हता. कर्मचाऱ्यांची अपुरी संख्या आणि प्रलंबित निधीमुळे अनेक वर्ष हे काम रखडले होते.” डॉ. विखेंनी पुढे सांगितले की, “मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ऊर्जा राज्यमंत्री मेघना सकोरे (बोर्डीकर) यांच्याकडे मी सातत्याने पाठपुरावा करून हे कोट्यवधी रुपयांचे काम मंजूर करून घेतले आहे. आमदार हेमंत ओगले यांनीही यासाठी शासनाचे लक्ष वेधले. हे काम एक वर्षात पूर्ण होऊन जिल्ह्यातील उद्योग, शेती आणि नागरी विकासाला चालना मिळेल.
डॉ. विखे यांनी आपल्या भाषणात आमदार ओगले यांचे कौतुक करताना थेटपणे राजकीय संदेशही दिला. “तालुक्याच्या विकासासाठी ओगले यांनी अपेक्षेपेक्षा अधिक सहकार्य केले आहे. अशी जोडी विकासासाठीच हवी असते, मात्र चुकीच्या संगतीत न जाता भविष्य उज्ज्वल ठेवा,” असा थेट सल्ला त्यांनी दिला.
या कार्यक्रमास भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर, तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे, संजयगांधी योजनाचे माजी तालुकाध्यक्ष गणेश मुद्गुले, सागर भोसले, ज्ञानेश्वर मुरकुटे, प्रेमचंद कुंकूलोळ, जनाभाऊ खाजेकर, सुरेश जगताप, सनी मंडलिक, शहाजान बागवान, अशोक लोंढे, किरण खंडागळे, सुरेश शिवलकर, आनंद चावरे, संजय बोरगे, सुधीर ब्राह्मणे, मोहन आव्हाड, सुनील शिरसाठ, प्रदीप गायकवाड, नवाज शेख, दिनेश तरटे आदींची उपस्थिती होती. काँग्रेस आणि रिपब्लिकन पक्षांचेही अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते या कार्यक्रमात सहभागी झाले होते.या कार्यक्रमानंतरचे ‘चाय पे चर्चा’ सत्र म्हणजे राजकीय रंगमंचावरील एक आगळंवेगळं दृश्य होतं. सामान्य नागरिकांसाठी हे आश्चर्यकारक ठरत असले तरी काहीजणांसाठी हे राजकीय परिपक्वतेचं लक्षण मानलं जात आहे. एकमेकांवर टीका करणारे नेते विकासाच्या मुद्द्यावर एका ठिकाणी बसून चर्चा करत असल्याचे चित्र, आगामी निवडणुकीत काही संकेत देत आहे का? हे मात्र काळच ठरवेल. दत्तनगर एमआयडीसीतील भूमिपूजन कार्यक्रम हे केवळ विकासकामाचं औपचारिक उद्घाटन नव्हतं, तर तालुक्यातील राजकीय पटलावर नव्या समीकरणांचे संकेत देणारी घटना ठरली आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व पक्षांचा असा एकत्रित सहभाग हे श्रीरामपूरच्या राजकारणात दुर्मीळच दृश्य मानलं जातं. आता या एकीचं फलित निवडणुकीत दिसेल का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.