Homeमहाराष्ट्रशनिदेवगाव सप्ताहासाठी मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला गती

शनिदेवगाव सप्ताहासाठी मुख्य रस्त्याच्या दुरुस्तीला गती

महंत रामगिरी महाराज, आमदार बोरनारे व सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या प्रयत्नांना यश

वैजापूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील प्रसिद्ध श्री सद्गुरू योगीराज गंगागिरी महाराज सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर शनिदेवगावकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था लक्षात घेता, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांच्या मागणीनंतर सरला बेटाचे महंत पं.पू. रामगिरी महाराज, आमदार रमेश बोरनारे आणि विविध सामाजिक घटकांच्या प्रयत्नांनी अखेर रस्त्याच्या दुरुस्ती कामांना गती मिळाली आहे. नागमठाण पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ महंत रामगिरी महाराज यांच्या हस्ते पार पडला असून, शेतकऱ्यांच्या सहकार्यामुळे हे काम शक्य झाल्याचे त्यांनी सांगितले.

रांजणखोल येथे एका कार्यक्रमात आले असताना सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी महंत रामगिरी महाराज यांना वैजापूर तालुक्यातील शनिदेवगाव येथे होणाऱ्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या पार्श्वभूमीवर उंदीरगाव, महाकाळवाडगाव, नागमठाण या मार्गावरील रस्त्यांची दयनीय अवस्था निदर्शनास आणून दिली. या मार्गावर मोठ्या प्रमाणावर खड्डे असून काही ठिकाणी रस्ता पूर्णपणे खचला आहे. या रस्त्याचा वापर श्रीरामपूर, राहाता, राहुरी, अकोले, संगमनेर परिसरातील हजारो भाविक करत असल्याने त्यांची गंभीर गैरसोय होण्याची शक्यता होती. अशोक लोंढे यांच्या निवेदनाची गांभीर्याने दखल घेत महंत रामगिरी महाराज यांनी अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी तत्काळ चर्चा करून संबंधित रस्त्याचे काम लवकरात लवकर सुरू करण्याचे आश्वासन दिले. त्याच पार्श्वभूमीवर महाकाळवाडगाव मार्गावरील नागमठाण पुलास जोडणाऱ्या रस्त्याच्या कामाचा विधीवत शुभारंभ करण्यात आला. या रस्त्याच्या कामासाठी आमदार रमेश बोरनारे यांच्या प्रयत्नातून ३ कोटी ७५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, या कामात सर्वात मोठी अडचण म्हणजे शेतजमिनीचे अधिग्रहण होती. शेतकऱ्यांनी मोबदला न मिळालेल्या स्थितीतही समाजहितासाठी आपली जमीन सार्वजनिक बांधकाम विभागास सुपूर्द केली. या संदर्भात सरला बेट येथे महंत रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन शेतकऱ्यांना त्यांच्या मोबदल्याचे आश्वासन देण्यात आले.

रस्त्याच्या भूमिपूजनावेळी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांमध्ये नितीन, प्रवीण व उत्तमराव गोडसे, मायाताई सोमवंशी, रागिणी भागवत, अनिल, सुनिल, रंगनाथ खुरूद, गांगुर्डे कुटुंबीय, मुश्ताक शेख, गणेश व गोकुळ खुरूद यांचा समावेश होता. या सर्वांचा महंत रामगिरी महाराजांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शेतकऱ्यांच्या या सामाजिक योगदानाचे उपस्थित भाविक व ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. पंचगंगा उद्योग समूहाचे चेअरमन प्रभाकर शिंदे यांनी महत्त्वपूर्ण पाठपुरावा करून उपमुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जमीनहस्तांतरणाचा प्रश्न पोहोचवला. वर्षभरापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कारखान्याचे भूमिपूजन केल्यानंतर नागमठाण पुल हा कारखान्यासाठी अत्यंत महत्त्वाचा दुवा ठरला. त्यामुळे हा रस्ता पूर्ण होणे आवश्यक होते.

अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही सप्ताह स्थळाची पाहणी करून कमालपूर बंधाऱ्याचे मजबुतीकरण, तसेच श्रीरामपूर भागातून येणाऱ्या रस्त्यांची तातडीने दुरुस्ती करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले असून, ती कामेही लवकरच सुरू होणार आहेत. महंत रामगिरी महाराज, आमदार बोरनारे, पालकमंत्री विखे पाटील, सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे, पंचगंगा उद्योग समूहाचे प्रभाकर शिंदे आणि स्थानिक शेतकरी यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे शनिदेवगाव सप्ताहासाठी जाणाऱ्या भाविकांना अखेर सुसज्ज व सुरक्षित प्रवासाचे मार्ग मोकळे झाले आहेत. हा धार्मिक आणि सामाजिक समन्वयाचा उत्तम आदर्श म्हणावा लागेल.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!