श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील गोंधवणी रोड, जुन्या पोस्ट कॉलनी शेजारील वसाहतीत राहणाऱ्या मातंग समाजासह इतर मागास व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांवर अन्यायकारक, बेकायदेशीर आणि अमानवी वागणूक दिली जात असल्याचा गंभीर आरोप करत संबंधित नागरिकांनी नगरपरिषद, तहसील कार्यालय, पोलीस प्रशासन आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे संयुक्त निवेदन दिले आहे. या निवेदनावर ३० पेक्षा अधिक रहिवाशांच्या स्वाक्षऱ्या असून, बेकायदेशीर कारवाया थांबवण्याची, दोषींवर कारवाई करण्याची व पुनर्वसनाची मागणी करण्यात आली आहे.
नागरिकांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या वसाहतीतील नागरिक अनेक वर्षांपासून येथे स्थायिक असून त्यांनी आपले संसार, शिक्षण आणि उपजीविकेचे व्यवस्थापन याच परिसरात उभे केले आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून, काही नगरसेवक आणि संबंधित कर्मचाऱ्यांकडून केवळ वैयक्तिक सूडभावनेतून तगडा छळ करण्यात येत आहे. बुलडोझर लावण्याची धमकी, सकाळी घरात घुसून दडपशाही, “साहेबांची ऑर्डर” सांगून घरं उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न अशा प्रकारांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. याचबरोबर, मानसिक छळासाठी वसाहतीत सांडपाणी सोडणे, सडलेले मास टाकणे, मोकाट डुक्कर-कुत्र्यांना सोडणे असे घृणास्पद प्रकार वारंवार घडत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. यामुळे लहान मुलांचे आरोग्य, महिलांची सुरक्षितता आणि वृद्धांची शांतता धोक्यात आली आहे. “गरिबांना न्याय मिळवण्यासाठी उपाशीपोटी, अनवाणी पायांनी वारंवार पालिकेत जावे लागते, पण कोणीही ऐकत नाही. हा केवळ आमच्या घराचा नव्हे, तर आमच्या अस्तित्वाचा लढा आहे,” असे स्पष्ट करत नागरिकांनी प्रशासनावर निष्क्रियतेचा ठपका ठेवला आहे.
निवेदनात नागरिकांनी चार मुख्य मागण्या मांडल्या आहेत त्यामध्ये वसाहतीवरील बेकायदेशीर कारवाया तात्काळ थांबवाव्यात. संबंधित नगरसेवक व कर्मचाऱ्यांची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी. रहिवाशांना संरक्षण व पुनर्वसनाची लेखी हमी द्यावी. मानसिक छळ करणाऱ्या कृतींचा तात्काळ बंदोबस्त करावा. जर प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले, तर नागरिकांनी नगरपालिका समोर कुटुंबासह उपोषण व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला आहे. या सर्व परिणामांना प्रशासन जबाबदार राहील, असे ठामपणे सांगण्यात आले आहे.
या निवेदनावर सायरा सलीम शेख, कलावती नानासाहेब भालेरावअनिल दुशिंग, जयू सोनवणे, दीपक मधुकर खंडागळे, भारत मधुकर खंडागळे, जमीर शेख, दीपक शेलार, अनिता तुकाराम खंडागळे, पार्वती विष्णू गाढ, शमीम निसार सय्यद, अनिता राजू सूर्यवंशी, शकीला दिलावर शेख, सविता श्रावण वैरागर, संगीता शामवेल सकट, शोभा बबलू वैरगर, जया बाप्पू दांडगे, कुंदाबई सुधाकर खंडागळे, सुरेश साहेबराव जाधव, रमेश साहेबराव जाधव रजिया शेख, दिनकर घुले, अतुल जाधव, विठाबाई सुनील खरातदिलीप आरू, मुंनिबाई शेख, संगीता बावस्कर, सोमा दादू खेत्रे लक्ष्मी बाबर, सायरा गरीब मिर्झा, शंकर घुले, सोनाली दादू शिनगारेशालिनी लक्ष्मण कांबळे, हिराबाई भोसले, संतोष चव्हाण आदी नागरिकांच्या सह्या आहेत. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी सामाजिक संघटनांतून आणि नागरिकांमधून जोर धरू लागली आहे. अन्यथा, हा प्रश्न फक्त रहिवाशांचा न राहता, संपूर्ण शहरातील सामाजिक अन्यायाचा मुद्दा बनू शकतो, असा इशाराही अनेकांनी दिला आहे.