श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील अवैध मटका अड्ड्यावर मोठ्या प्रमाणात धाड टाकून पोलिसांनी ८ लाख ६१ हजार ५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करत मुख्य दोन बुकींसह एकूण २२ जणांविरोधात गंभीर स्वरूपाची कारवाई केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्री. सोमनाथ घार्गे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या विशेष पथकाने केली. या कारवाईमुळे शहरातील मटका जुगारांच्या अवैध साखळीला मोठा धक्का बसला आहे. विशेष म्हणजे हे अड्डे शहरातीलच असून, अनेक दिवसांपासून नागरिकांकडून तक्रारी येत होत्या. अखेर पोलीस यंत्रणेने कंबर कसून या अवैध धंद्याच्या मुळावरच घाव घालण्याची सुरुवात केली.
दि. २७ जून रोजी पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांना खात्रीशीर माहिती मिळाली की, श्रीरामपूर शहरातील पूर्णवाद नगर, मुळा प्रवरा वीज सोसायटी परिसरात काही इसम मटका जुगाराचे बुकींग करत आहेत. यानंतर त्यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांना माहिती देत पंचासमक्ष छाप्यासाठी तयारी केली. पोलीस पथकाने घटनास्थळी धाड टाकली असता, २२ इसम मटका जुगाराचे व्यवहार करताना आढळून आले. त्यांच्याकडून १.३३ लाख रुपये रोख, २.२४ लाखांचे मोबाईल, ४.८० लाखांची वाहने, सुमारे २४ हजारांचा प्रिंटर व मटका जुगारासाठी लागणारे साहित्य असा एकूण ८,६१,५६० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या धडक कारवाईत मुख्य मटका बुकी म्हणून मुनीर इमाम पठाण (५५, सुभेदार वस्ती) व अभिजीत ऋषभ मुथा (४०, बेलापूर रोड) यांना ताब्यात घेण्यात आले. याशिवाय मटका खेळणारे आणि खेळवणारे इतर २० इसम देखील घटनास्थळी सापडले. याशिवाय अटकेत घेतलेल्या आरोपीं सादीक शेख, आकाश पोटे, अवधुत शिंदे, लालजीत यादव, संदीप सुर्यवंशी, सचिन गावडे, सागर बनगे, शाहरुख चांदखास, किसन शिंदे, महेश पवार, विक्रांत लोखंडे, राहुल चौधरी, ललित तांबे, राजु ताभाडे, मंजुर सय्यद, ख्वाजा पठाण, स्वप्निल तांबे, नामदेव गोंधरे, नसरुद्दीन शेख, अल्ताफ शेख हे सर्व श्रीरामपूर व राहता तालुक्यातील आहेत.
या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. ६२८/२०२५, महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदा कलम १२(अ) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करून पुढील तपास पोलीस करीत आहेत. सदरच दिवशी श्रीरामपूर शहरातील मेनरोड, गांधी पुतळा, भगतसिंग चौक, गिरमे चौक, शिवाजी चौक, सय्यद बाबा चौक, वॉर्ड नं. २ परिसरात दुचाकी-चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमण हटवण्यात आले. ही संयुक्त मोहीम श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी यशस्वीरित्या पार पाडली.
ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक श्री. सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, प्रशांत खैरे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. कारवाईत परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र वाघ, शकील शेख, शंकर चौधरी, अजय साठे, अरविंद भिंगारदिवे, मल्लिकार्जुन बनकर, दिनेश मोरे, उमेश खेडकर, सुनिल पवार, सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दिपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी परिश्रम घेतले. शहरातील अवैध धंद्यांवर कडक कारवाई करताना पोलिसांनी आणखी मोठ्या कारवायांचे संकेत दिले असून, अशा कारवायांमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीना चाप बसण्याची अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.