नेवासा (प्रतिनिधी) – तालुक्यातील गोधेगाव येथे गोदावरी नदीच्या पात्रातून अवैध वाळू उपसून वाहतूक करणाऱ्या तिघा आरोपींना ताब्यात घेत पोलिसांनी ७५ लाख ८० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. इतर सहा आरोपी घटनास्थळावरून पळून गेले असले तरी त्यांची ओळख पटली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांच्या आदेशानुसार जिल्ह्यातील अवैध गौणखनिज उपसा रोखण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली. उपअधीक्षक संतोष खाडे यांनी गुप्त माहितीच्या आधारावर २५ जून रोजी नेवासा पोलीस स्टेशन हद्दीत सापळा रचला. त्यावेळी गोधेगाव शिवारातील गोदावरी नदीपात्रात जेसीबीच्या साहाय्याने अवैध वाळू उपसून ट्रॅक्टरच्या ट्रॉलींमध्ये भरून बेकायदा वाहतूक करताना इसम आढळले. छापा टाकताच आरोपींनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची नावे प्रविण म्हस्के (रा. नेवासा खुर्द), विशाल ठोंबरे (रा. गोधेगाव) व अभिषेक जाधव (रा. गोधेगाव) अशी आहेत. इतर आरोपी राजेंद्र गोलांडे, दिलीप शेलार, कृष्णा परदेशी, कल्याण उन्हाळे, काका पठारे आणि एक कुबोटा ट्रॅक्टर मालक हे फरार झाले आहेत.
या कारवाईत पोलिसांनी १ जेसीबी, ६ ट्रॅक्टर व ५ ब्रास वाळू असा एकूण ७५.८० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यात विशाल ठोंबरे याचा जेसीबी (३० लाख रुपये), काका पठारे, दिलीप शेलार, कृष्णा परदेशी, राजेंद्र गोलांडे व कल्याण उन्हाळे यांच्या मालकीचे ट्रॅक्टर-ट्रॉली आणि ५ ब्रास वाळूचा समावेश आहे. नेवासा पोलिसांनी आरोपींविरोधात भा.न्या.सं. कलम ३०५(ई), ३(५) व पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम ३/१५ अन्वये गुन्हा नोंदवला असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक संतोष खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली नेवासा पोलिस करीत आहेत. या यशस्वी कारवाईत अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. सुनिल पाटील यांचे मार्गदर्शन लाभले असून पोसई राजेंद्र वाघ, पोहेकॉ शकील शेख, शंकर चौधरी, अजय साठे, दिगंबर कारखिले, मल्लिकार्जुन बनकर, सुनिल पवार, उमेश खेडकर, अरविंद भिंगारदिवे, दिनेश मोरे, सुनिल दिघे, अमोल कांबळे, विजय ढाकणे, दीपक जाधव, जालिंदर दहिफळे यांनी कारवाई केली.