Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरअखेर मैला मिश्रित पाणीपुरवठा प्रकरणी तीन नागरिकांवर नगरपालिकेने केला श्रीरामपूर शहर पोलीस...

अखेर मैला मिश्रित पाणीपुरवठा प्रकरणी तीन नागरिकांवर नगरपालिकेने केला श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सामाजिक संघटनांनी केली होती तीव्र मागणी

श्रीरामपूर — शहरातील मिलतनगर साठवण तलावातील पाणीपुरवठा पाईपलाईनला मोठे छिद्र पाडून जाणीवपूर्वक मैला मिश्रित पाणी सोडल्याच्या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे अखेर तिघांविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण उघडकीस आल्यानंतर शहरात तीव्र संतापाची लाट उसळली असून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) जिल्हा कार्याध्यक्ष सुभाषदादा त्रिभुवन, मर्चंट असोसिएशनचे अध्यक्ष गौतम उपाध्ये, शिवसेना नेते संजय छल्लारे, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजीत लिपटे, सामाजिक कार्यकर्ते संदीप पवार, भीम आर्मीचे सचिन ब्राह्मणे, बहुजन समाज पार्टीचे सुरेश कांबळे राष्ट्रीय जनसेवा पार्टीचे जिल्हाध्यक्ष तेजस गायकवाड यांसह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी एकवटून नगर परिषदेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेतली होती.

या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे संबंधित दोषींविरोधात कठोर फौजदारी कारवाई करण्याची लेखी मागणी केली होती. त्यानंतर श्रीरामपूर नगर परिषदेचे अभियंता अभिषेक जितेंद्र मराठे (वय २६, रा. साक्री, जि. धुळे, ह. मु. लबडे वस्ती, थत्ते ग्राऊंड, श्रीरामपूर) यांनी श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली. मराठे हे नगर परिषदेच्या पाणीपुरवठा आणि आरोग्य विभागाचा अतिरिक्त कार्यभार सांभाळतात. तक्रारीनुसार, ६ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी १० वाजता मिलतनगर साठवण तलावावर काम चालू असताना पाईपलाईनमध्ये दुर्गंधीयुक्त मैला मिश्रित पाणी आढळले. नगर परिषदेच्या पाणीपुरवठा विभागाचे अभियंता निलेश गजानन पाटील व प्लंबर सागर माधव हिवाळे, उमेश गोरख बवे, संदीप देवकर यांना बोलावून तपासणी केली असता, मिलतनगर वार्ड क्रमांक १, गार्ड रेसिडेन्सीच्या शेजारी हनिफ उस्मान शाह, फिरोज रशिद पठाण व रऊफ उस्मान शाह यांच्या घरामागील पाईपलाईनला मोठी छिद्रे पाडून मैला सोडण्यात आल्याचे उघड झाले.

या आरोपींना नगर परिषदेने नोटीस दिली असतानाही त्यांनी या मार्गे स्वच्छ पाणीपुरवठा पाईपलाईनचे नुकसान करून नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण केला. श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात आरोपी हनिफ उस्मान शाह, फिरोज रशिद पठाण आणि रऊफ उस्मान शाह यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम २७९ व ३२६(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक शरद अहिरे करत आहेत. या गंभीर प्रकरणी नागरिकांनी संताप व्यक्त केला असून दोषींना कठोर शिक्षा करून अशा प्रकारच्या घटना रोखण्याची मागणी जोर धरत आहे. या पार्श्वभूमीवर श्रीरामपूर शहरात स्वच्छ पाणीपुरवठा आणि आरोग्य सुरक्षेसाठी प्रशासन सतर्क झाले असून नागरिकांनीही पाणीपुरवठ्याबाबत सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!