श्रीरामपूर (प्रतिनिधी) – श्रीरामपूर शहर पोलिसांनी सरला बेट धाम दिंडीतील वारकऱ्यांचे चोरी गेलेले तीन मोबाईल केवळ दोन तासांत जप्त करून सराईत चोरट्यास अटक केली आहे. हा प्रकार २२ जून २०२५ रोजी पहाटे ५ वाजेच्या सुमारास स्वयंवर मंगल कार्यालय येथे घडला. यावेळी सरला बेट धामच्या दिंडीत सहभागी असलेले काही वारकरी श्रीरामपूर येथे विसावा घेत असताना, चोरट्याने संधी साधून चार्जिंगला लावलेले तीन मोबाईल चोरून नेले. या चोरीची माहिती पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांना मिळताच त्यांनी तपास पथकाला तातडीने घटनास्थळी जाऊन तांत्रिक तपास व शोधकार्य करण्याचे आदेश दिले.
पोलिसांनी केलेल्या तत्पर तपासात हा गुन्हा श्रीरामपूर, वॉर्ड नं. ०६ मधील सराईत आरोपी किरण जगन्नाथ चिकणे याने केल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ त्याच्या घरी धाड टाकून त्याला ताब्यात घेतले व त्याच्याकडून तीन मोबाईल जप्त केले. यामध्ये: विवो कंपनीचा Y-16 मॉडेलचा ग्रे रंगाचा मोबाईल (किंमत १०,०००/- रुपये, मालक: ज्योती निकम, वैजापूर), विवो Y-29 मॉडेलचा आकाशी रंगाचा मोबाईल (किंमत १५,०००/- रुपये, मालक: गोविंद भाऊसाहेब न्हावले, लाडगाव, वैजापूर), रिअलमी rmx1941 मॉडेलचा मोबाईल (किंमत १०,०००/- रुपये, मालक: जयश्री भिमराज गायकवाड, वैजापूर) असे एकूण ४०,०००/- रुपये किमतीचे मोबाईल सदर आरोपीकडून जप्त करण्यात आले.

हा संपूर्ण तपास व कारवाई मा. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, मा. अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपुजे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितिन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक समाधान सोळंके, पोलीस कॉन्स्टेबल अमोल गायकवाड, अमोल पडोळे, मच्छिंद्र कातखडे, संभाजी खरात, अजित पटारे, आजिनाथ आंधळे, सागर बनसोडे, रामेश्वर तारडे यांनी केली. सदर आरोपीला पोलिसांनी तात्काळ ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर प्रक्रिया श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनकडून सुरू आहे. श्रीरामपूर पोलिसांच्या त्वरित व कौतुकास्पद कामगिरीमुळे वारकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. मोबाईल मिळून आल्यानंतर पोलीस उपनिरीक्षक सोळंके व त्यांच्या सहकाऱ्यांचा दिंडीच्या वतीने सत्कार करण्यात आला. श्रीरामपूर पोलिसांच्या तत्पर कारवाईचे सर्वत्र कौतुक होत असून आरोपीविरुद्ध कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.