श्रीरामपूर (प्रतिनिधी) – तालुक्यातील निमगाव खैरी येथे एका चप्पल दुकानदारास व त्याच्या वडिलांना जातीवाचक शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने आणि टोकदार हत्याराने मारहाण करण्यात आली. याप्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहितेच्या विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून शुभम हुसले या आरोपीस अटक करण्यात आली आहे.
या गुन्ह्याची तक्रार दिपक बाळासाहेब तुपे (वय २६, व्यवसाय – चप्पल दुकान, रा. निमगाव खैरी) यांनी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात दिली असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार आरोपी निलेश बाळासाहेब परदेशी, विलास शिवाजी वाघ, धनंजय रोहम (पूर्ण नाव अज्ञात), अमोल दुशिंग (पूर्ण नाव अज्ञात), सौरभ उर्फ अभिजीत राजपूत (पूर्ण नाव अज्ञात), तुषार वाघ (पूर्ण नाव अज्ञात) आणि शुभम हुसले यांच्या विरोधात श्रीरामपूर तालुका पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर क्रमांक ३२९/२५ दाखल केला आहे. फिर्यादीच्या म्हणण्यानुसार फिर्यादी दिपक तुपे यांचे वडील बाळासाहेब तुपे व त्यांचा भाचा शिवाजी देशमुख हे दुपारी साडेतीन वाजता ‘हॉटेल गीतगंगा’ येथे बसलेले असताना वरील आरोपींनी त्यांच्याकडे पाहून “तुम्ही खालच्या जातीचे आहात, आमच्यासमोर बसण्याची तुमची लायकी नाही” असे जातिवाचक अपमानकारक शब्द वापरून हिणवले. त्यानंतर “आम्ही हिंदू राजपूत आहोत” असे म्हणत दोघांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि हॉटेलमधून हाकलून लावले. या अपमानास्पद व हिंसक प्रकारानंतर दिपक तुपे आणि त्यांचे वडील पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात असताना, निमगाव इंद्रा नगर झोपडपट्टी भागातील शिवा टेलरच्या दुकानासमोर त्यांना अडवून, आरोपी निलेश परदेशी याने धमकी दिली की, “आमच्याविरुद्ध तक्रार देतात? आम्ही खैरीचे बाप आहोत, तुम्हाला जिवंत ठेवणार नाही.” असे म्हणून लाकडी दांडक्याने आणि टोकदार हत्याराने दोघांवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात दोघांनाही गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर श्रीरामपूर येथील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या संपूर्ण प्रकरणाने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या प्रकरणी श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात भादंवि व अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार BNS कलम 109(1), 32(3), 3(r)(s), 119, 126, 189(2), 190, 191(2), 191(3), 115(2), 352, 351(2)(3), 324(4) या कलमांनुसार आरोपींनी सामूहिक मारहाण, जातीय अपमान, धमकी, शस्त्राने हल्ला, आणि कायद्याचे उल्लंघन करून गंभीर गुन्हा केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. बसवराज शिवपूजे हे करीत असून सध्या शुभम हुसले या आरोपीला अटक करण्यात आली असून अन्य आरोपी अद्याप फरार आहेत. या घटनेनंतर दलित समाजात संतापाची लाट पसरली असून आरोपींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. पोलिसांनी तत्काळ कार्यवाही करून एका आरोपीस ताब्यात घेतले असले, तरी उर्वरित आरोपींना तातडीने अटक करण्याची गरज आहे. तसेच, जातीय द्वेषातून घडलेल्या या प्रकारामुळे सामाजिक सलोखा धोक्यात आला असून, पोलिसांनी या प्रकरणात कठोर भूमिका घेतली आहे. पीडितांच्या कुटुंबियांना संरक्षण देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे.