श्रीरामपूर (प्रतिनिधी) – येथील मोरया डान्स अकॅडमी तर्फे आयोजित डान्स शो 2025 शहरात मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. या शो ला लहान मुलांपासून वयोवृद्धांपर्यंत सर्व वयोगटातील प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद लाभला. विविध वेशभूषा, थरारक नृत्ये, कथानक सादरीकरण आणि उत्कंठावर्धक सादरीकरणांनी शो रंगतदार झाला. कार्यक्रमात लहानग्यांनी दिलेल्या नृत्याविष्काराने उपस्थितांची मने जिंकली. विशेषतः ‘शिवरायांचा छावा’ या विषयावर आधारित नृत्य-नाट्य सादरीकरणाने उपस्थितांना इतिहासाची आठवण करून देत भारावून टाकले. या सादरीकरणाने प्रेक्षकांच्या डोळ्यांत पाणी आणले तर काहीजणांनी उभे राहून टाळ्यांच्या गजरात कौतुकाची थाप दिली. कार्यक्रमाच्या अखेरीस सादर करण्यात आलेल्या ‘हॉरर डान्स’ या नृत्य प्रकाराने तर प्रेक्षकांमध्ये थरार निर्माण केला. प्रकाशयोजना, पार्श्वसंगीत आणि कलाकारांचा अभिनय यामुळे संपूर्ण प्रेक्षागृह काही क्षणांसाठी खिळवून ठेवले गेले. विशेषतः या सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता लक्षवेधी ठरली.

या शानदार कार्यक्रमाला भि.रा. खटोड कन्या विद्यालयाचे चेअरमन मा. दत्तात्रय साबळे सर, नवीन मराठी शाळेचे चेअरमन मा. ऋषिकेश जोशी, तसेच मुख्याध्यापक श्री. सचिन मुळे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतातून मुलांच्या कलागुणांचे, मेहनतीचे आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाचे मनापासून कौतुक केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. भरत शेंगाळ सर, श्री. सचिन चंदन सर,दत्तात्रय शिरसाठ, निर्मला चंदन मॅडम आणि श्रीरामपूर चे सगळे कलाकार यांनी विशेष मेहनत घेतली. तर कार्यक्रमाची प्रभावी प्रस्तावना श्रीमती रुही सय्यद यांनी करत उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे संयोजन आणि संपूर्ण नियोजन मोरया डान्स अकॅडमीचे संस्थापक कासिम सर यांनी उत्तमरीत्या पार पाडले. त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केलेल्या सर्व कलाकार, पालक, प्रशिक्षक आणि उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमाने श्रीरामपूरमध्ये नवोदित कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देत एक प्रेरणादायी पर्व सुरू केले असून, मोरया डान्स अकॅडमीच्या पुढील उपक्रमांकडे आता शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.
