Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरमध्ये वीज पोल कोसळल्यामुळे २४ तास वीज गायब; मनसेचे महावितरणवर आक्रमक आंदोलन...

श्रीरामपूरमध्ये वीज पोल कोसळल्यामुळे २४ तास वीज गायब; मनसेचे महावितरणवर आक्रमक आंदोलन आणि सखोल निवेदन

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – शहरातील बाभळेश्वर सबस्टेशन परिसरात महावितरणच्या गलथान कारभारामुळे एकाचवेळी सहा वीज पोल कोसळल्याने संपूर्ण श्रीरामपूर शहर अंधारात गेले. तब्बल २४ तास वीजेचा पुरवठा ठप्प राहिल्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. या घटनेने केवळ घरगुती वापरावर परिणाम झाला नाही, तर व्यापारी, औद्योगिक, आरोग्य, शैक्षणिक क्षेत्रांनाही जबर फटका बसला. शाळा, कॉलेजमधील ऑनलाईन वर्ग बंद पडले; हॉस्पिटल्समधील यंत्रणा ठप्प झाल्या, आणि व्यापाऱ्यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महावितरणच्या श्रीरामपूर कार्यालयावर धडक देत, महावितरणच्या ढिसाळ कामकाजावर जोरदार नाराजी व्यक्त करणारे आक्रमक निवेदन सादर केले. शहराध्यक्ष स्वप्निल नंदकिशोर सोनार यांच्या नेतृत्वाखाली मनसेच्या शिष्टमंडळाने हे निवेदन दिले. निवेदनात स्पष्ट शब्दांत नमूद करण्यात आले की, वीज पोल कोसळण्याच्या घटना केवळ निसर्गामुळे नाहीत, तर महावितरणच्या हलगर्जीपणामुळे घडत आहेत. त्यामुळे महावितरणला नैतिक व प्रशासकीय जबाबदारी नाकारता येणार नाही, असा थेट इशारा देण्यात आला.

स्वप्निल सोनार यांनी नमूद केले की, यापूर्वीही अशा घटना घडल्या असून, फक्त माती टाकून तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती. ही तात्पुरती कामेच पुढे जीविताला धोका ठरू शकतात. म्हणूनच यापुढे अशा घटनांना आळा बसावा, यासाठी महावितरणने पावसाळ्यापूर्वी संपूर्ण शहरातील वीज पोल आणि वायरिंग यंत्रणेचे सर्वेक्षण तातडीने करावे, अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे. नवीन पोल उभारणी करताना केवळ माती न टाकता, सिमेंट-काँक्रेटचा वापर करून मजबूत पाया घालण्यावर भर देण्याचीही अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. या कामांचा सविस्तर तांत्रिक अहवाल तयार करून वरिष्ठ कार्यालयाला सादर करावा, अशीही स्पष्ट सूचना देण्यात आली.

महत्त्वाचे म्हणजे, या निवेदनाद्वारे मनसेने महावितरणला ठाम इशारा दिला की, भविष्यात अशा घटना पुन्हा घडून नागरिकांचे जीवित वा मालमत्तेचे नुकसान झाले, तर संपूर्ण जबाबदारी महावितरणवर राहील. याशिवाय, जर या मागण्यांकडे दुर्लक्ष झाले, तर मनसेकडून ‘खळकट्यात’ तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा खुला इशारा यावेळी देण्यात आला. वीज बंद असल्यामुळे शहरातील अनेक व्यवसायांचे मोठे नुकसान झाले. थंड पेय विक्रेते, सायबर कॅफे, मेडिकल स्टोअर्स, वर्कशॉप्स यांसारख्या व्यवसायांना जबर फटका बसला. यामुळे अस्वस्थ नागरिकांनी मनसेच्या आंदोलनाचे स्वागत करत “शेवटी कुणीतरी आमच्यासाठी उभे राहिले,” अशा भावना व्यक्त केल्या.

या निवेदनावर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे, जिल्हा सचिव डॉ. संजय नवथर, जिल्हा उपाध्यक्ष सतीश कुदळे, तालुका अध्यक्ष अमोल साबने, तालुका उपाध्यक्ष बाळासाहेब ढाकणे, शहराध्यक्ष स्वप्निल सोनार, शहर उपाध्यक्ष संदीप विशबर, विद्यार्थी सेनेचे तालुका उपाध्यक्ष निखिल तोरणे, शहराध्यक्ष कुणाल सूर्यवंशी यांच्यासह यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. शहरातील नागरिक आणि व्यापाऱ्यांनी या आंदोलनाचा पाठिंबा देत महावितरणने याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी केली आहे. मनसेचा हा संघर्ष आता जनतेच्या सुरक्षिततेसाठी उभा राहिलेला एक बुलंद आवाज ठरत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.6 ° C
26.6 °
26.6 °
87 %
1.5kmh
100 %
Tue
28 °
Wed
31 °
Thu
29 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!