Homeमहाराष्ट्रसंगमनेरसंगमनेर तालुक्यातील अवकाळी पावसाचा कहर; मनसेचे तहसीलदारांना निवेदन, पंचनाम्यांची मागणी

संगमनेर तालुक्यातील अवकाळी पावसाचा कहर; मनसेचे तहसीलदारांना निवेदन, पंचनाम्यांची मागणी

संगमनेर /प्रतिनिधी :- तालुक्यात अवकाळी पावसाने पुन्हा एकदा थैमान घातले असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्याच्या विविध भागांमध्ये वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे शेतीसोबतच अनेक गोरगरीब नागरिकांच्या घरांचे देखील मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या तालुका अध्यक्ष राहुल पानसरे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने तहसीलदारांना निवेदन दिले असून, त्वरीत सरसकट पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.

मागील काही दिवसांपासून संगमनेर तालुक्यात हवामानात सतत चढ-उतार होत असताना, २५ आणि २६ मे रोजी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. यामुळे टोमॅटो, कांदा, मका, कपाशी, केळी, डाळिंब आदी पिकांचे मोठे नुकसान झाले. अनेक शेतकऱ्यांचे उभे पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले असून, काहींच्या शेतातील झाडे व झुडपे उन्मळून पडली आहेत. पावसासोबत आलेल्या वादळी वाऱ्याने फक्त शेतातच नव्हे तर नागरिकांच्या घरांवरही परिणाम झाला आहे. अनेक गोरगरीब कुटुंबांच्या घराचे पत्रे उडाले, लाकडी शेड कोसळले, काही घरांमध्ये पाणी शिरले असून, रहिवासी उघड्यावर आले आहेत. त्यांच्या जीवनावर संकट ओढावले असून, काही ठिकाणी राहताच येणे कठीण झाले आहे. अशा संकटग्रस्तांना तत्काळ मदतीची गरज आहे.

या पार्श्वभूमीवर मनसे तालुका अध्यक्ष राहुल पानसरे, उपाध्यक्ष सुरज तळेकर, संघटक ऋषिकेश गिरी, सरचिटणीस बजरंग घुले, सचिव दिलीप ढेरंगे, चिटणीस संजय शिंदे, मनसैनिक अतुल अनास्थे, अमोल लावरे, किरण पावबाके, रवींद्र ढमाले, हेमंत गोसावी, संतोष तापडिया आदींनी तहसील कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले.

या निवेदनात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तातडीने पंचनामे करावेत. घरांचे नुकसान झालेले गोरगरीब नागरिक देखील पंचनाम्याच्या कक्षेत यावेत. शेतीतील झाडे, झुडपे, आंतरशेतीचे रस्ते यांचाही पंचनामा करण्यात यावा. सरसकट पंचनामे करून शासनाकडे तातडीने प्रस्ताव पाठवावा. शेतकऱ्यांना त्वरित नुकसानभरपाई मिळवून द्यावी. या मागण्या करण्यात आल्या आहेत. या मागण्यांकडे प्रशासनाने चार ते पाच दिवसांत लक्ष दिले नाही, तर मनसे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनासमोर आता मोठे आव्हान निर्माण झाले आहे.

निवेदन सादर करताना राहुल पानसरे यांनी तीव्र शब्दांत प्रशासनावर टीका केली. ते म्हणाले, “शेतकरी दिवसरात्र राबून आपल्या शेतात मेहनत घेत असतो. मात्र, निसर्गाच्या कोपाने त्याच्यावर संकट येते आणि त्याला मदत करायला प्रशासन सज्ज असायला हवे. पण आजही अनेक गावांमध्ये एकही अधिकारी फिरकलेला नाही. ही गंभीर बाब आहे. पंचनामे न झाल्यास मनसे गप्प बसणार नाही.” मनसे सरचिटणीस बजरंग घुले म्हणाले, “सरकारकडून मोठमोठ्या योजना जाहीर केल्या जातात, पण वेळेवर मदत मिळत नाही. अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आहे. त्याला आर्थिक मदतीची तातडीने गरज आहे. जिल्हा प्रशासनाने झोपेतून जागे व्हावे.”

या संदर्भात तहसीलदार कार्यालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, “तक्रार मिळताच आमचे पथक काही गावांमध्ये पाठवले गेले आहे. उर्वरित ठिकाणी देखील पंचनामे करण्यासाठी नियोजन सुरू आहे. लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात येईल.” मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या पावसाळ्यात तालुकास्तरावर शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर विशेष मोहीम राबवणार आहे. प्रत्येक गावातील शेतकऱ्यांची स्थिती जाणून घेऊन, सरकारला जाब विचारला जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या मुद्द्यावर राजकीय वातावरण तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
28.4 ° C
28.4 °
28.4 °
76 %
2kmh
100 %
Tue
28 °
Wed
30 °
Thu
28 °
Fri
31 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!