Homeमहाराष्ट्रश्रीरामपुर३१ मे रोजी श्रीरामपूर येथे राज्यव्यापी मेळाव्यात लाल निशाण पक्षाचे भाकप माले...

३१ मे रोजी श्रीरामपूर येथे राज्यव्यापी मेळाव्यात लाल निशाण पक्षाचे भाकप माले लिबरेशनसोबत विलिनीकरण

श्रीरामपूर – लाल निशाण पक्ष, चे विलीनीकरण भाकप माले (लिबरेशन) पक्षासोबत शनिवार दिनांक ३१ मे २०२५ रोजी श्रीरामपूर, जिल्हा अहील्यानगर येथील गोविंदराव आदिक सभागृह येथे होणाऱ्या ऐक्य परिषदेत होईल. भाजप प्रणित सरकारने लोकशाही बाजूला टाकून उघडपणे फॅसीझम कडे देशाला नेण्याचे प्रयत्न चालवलेले आहेत, त्या विरोधात सर्व लोकशाहीवादी संघटनांनी एकत्रित येऊन मुकाबला केला पाहिजे, ही भूमिका घेऊन दोन्ही पक्ष काम करीत आहेत. लाल निशाण पक्षाचे विलीनीकरण भाकप माले लिबरेशन सोबत होण्याने महाराष्ट्रातील डाव्या चळवळीला बळ तर मिळेलच परंतु देशातील पुरोगामी चळवळीला बळ मिळेल, डाव्या चळवळीच्या एकजुटीला चालना मिळेल व फॅसीझम विरोधी लढ्याला ऊर्जा मिळेल अशा विश्वासाने हे पाऊल टाकण्यात आले आहे. या विलीनीकरण परिषदे करीता भाकप माले लिबरेशन पक्षाचे महासचिव कॉम्रेड दिपांकर भट्टाचार्य उपस्थित राहणार आहेत, त्याचबरोबर बिहार मधून लोकसभेतील खासदार व पक्षाचे नेते कॉम्रेड राजाराम सिंह, योजना कर्मचाऱ्यांच्या नेत्या आमदार शशी यादव, एक्टू या मध्यवर्ती कामगार संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शंकर तर लाल निशाण पक्षाच्या मध्यवर्ती समितीचे नेते उपस्थित राहणार आहेत. यामध्ये लाल निशाण पक्ष व भाकपा माले चे महाराष्ट्रातील प्रमुख ७०० हून अधिक प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या घटनेमुळे मुळे देशातील डाव्या चळवळी मधील दोन प्रदीर्घ काल सुरु असणार्‍या व उज्वल परंपरांचे एकीकरण होत आहे.

लाल निशाण पक्षाची प्रदीर्घ उज्वल परंपरा असून सन १९४२ सालात भारतीय कम्युनिस्ट पक्षात कार्यकर्ते असणाऱ्या कॉम्रेड एस के लिमये, कॉम्रेड यशवंत चव्हाण, कॉम्रेड भाऊ फाटक यांनी पक्षाच्या तत्कालीन धोरणाच्या विरोधात जाऊन चलेजाव चळवळीत भागीदारी केली. त्यावेळी जर्मनीचा फॅसिस्ट हुकूमशहा हिटलर यांच्यामुळे संपूर्ण जग दुसरा महायुद्धाच्या खाईत लोटले गेले होते. हिटलरच्या फॅसीझमच्या विरोधात व लोकशाहीच्या संरक्षणाकरता युद्ध चालू होते. या युद्धात लोकशाहीची बाजू कमकुवत होऊ नये म्हणून भारतीय कम्युनिस्ट पक्षाने चले जाव आंदोलनापासून दूर राहण्याचे ठरवले. परंतु कॉम्रेड एस के लिमये, कॉम्रेड यशवंत चव्हाण, कॉम्रेड भाऊ फाटक यांनी स्वतंत्र भारतच फॅसीझमच्या विरोधी लढाईत योग्य भूमिका बजावू शकेल अशी भूमिका घेऊन चलेजाव चळवळीत भागीदारी केली. या त्यांच्या पक्षधोरणा पेक्षा वेगळ्या भुमिकेबद्दल त्यांना पक्षातून काढून टाकले. त्यांच्या योग्य भूमिकेमुळे असंख्य तरुण त्यांच्या भोवती जमले. त्यानंतर या सर्वांनी एकत्र येऊन प्रथम नवजीवन संघटना स्थापन केली व नंतर त्याचे रूपांतर लाल निशाण पक्षात झाले. सुरुवातीच्या काळामध्ये कॉम्रेड ए .डी भोसले, कॉम्रेड डी. एस कुलकर्णी, कॉम्रेड संतराम पाटील, मधुकर कात्रे, कॉम्रेड नाना शेटे, कॉम्रेड पी डी दिघे, कॉम्रेड डी एस देशपांडे, कॉम्रेड लिला ताई भोसले, सुशिलाबाई कुलकर्णी इत्यादी तरुण तरुणीनी त्यांना साथ केली व कामगारांना संघटित करण्याकरता मुंबई, पुणे, कोल्हापूर, अहमदनगर मराठवाड्यातील काही भाग, इत्यादी ठिकाणी लढ्याचा केंद्रची उभारणी केली. स्वातंत्र्यानंतर लगेच झालेल्या दडपशाहीच्या काळात कॉम्रेड दत्ता देशमुख, कॉम्रेड व्ही एन पाटील, क्रांतीसिंह नाना पाटील, क्रांतीवीर नागनाथ नायकवडी, भाई सथ्था, कॉम्रेड जीवनराव सावंत इत्यादी शेतकरी नेतेही त्यांचे सोबत येऊन त्यांनी कामगार किसान पक्ष स्थापला .त्याचेच रुपांतर पुढे लाल निशाण पक्षात झाले. शेतकरी समाजाचे नेते व पददलितांचे कैवारी कॉ बावके व दलीत समाजाचे नेते तसेच लोक साहित्यकार कॉम्रेड भास्कर जाधव हेही यात सामील झाले. मागोवा मधून आलेले अशोक मनोहर हे लाल निशाण मध्ये सहभागी झाले. अत्यंत आक्रमक कामगार संघर्ष त्यांनी हाताळले. भाकपा माले शी संबंध जोडण्यात त्यांनी मोठी कामगिरी केली.

अशा प्रकारे या विविध नेत्यांच्या नेतृत्वाखाली लाल निशाण पक्षांचे स्वरूप शेतकरी, कामगार, दलीत, बहुजनांच्या चळवळीचा पक्ष असे झाले. महाराष्ट्रात कुळ कायदा घडवण्यात व राबवण्यात व नंतर संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी मोठी भागीदारी केली. महाराष्ट्राच्या शेतकरी, शेतमजूर, भूमिहीन शेतकरी, ग्रामीण श्रमिक तसेच शहरातील संघटित कामगार तसेच असंघटित कामगार व इतर कष्टकरी, दलित, आदिवासी, महिला यांच्या चळवळीत मोठी भूमिका लाल निशाण पक्षाने बजावली. मुंबई शहरातील कापड गिरणी कामगार, औद्योगिक कामगार, असंघटित कामगांराबरोबरच सरकारी व निम सरकारी कर्मचारी, ग्रामीण श्रमिक, साखर कामगार, ऊस तोडणी कामगार, नगरपालिकेतील तळच्या समाजातील कामगार, अंगणवाडी, घरेलू कामगार इत्यादी श्रमिकांना संघटित करून त्यांना न्याय देण्याकरता मोठ्या संघर्षाचा इतिहास निर्माण केला. या क्रमात महाराष्ट्राच्या बहुसंख्य जिल्ह्यात कामगार कष्टकऱ्यांची स्वावलंबी अशी ट्रेड युनियन सेंटर “श्रमिक” हे लढ्याचे साधन निर्माण केले. त्याचबरोबर कामगार कष्टकऱ्यांनी स्वतःची पदरमोड करून दैनिक श्रमिक विचार हे वर्तमानपत्र नऊ वर्ष चालवले हा ही एक महाराष्ट्रात इतिहासच घडला आहे.

धरण व इतर प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे संघर्ष उभारून आधी पुनर्वसन मगच धरण व प्रकल्प हा कायदा करण्यात मोठी महत्त्वाची भूमिका बजावली. दुष्काळ निवारणाचे मोठे संघर्ष उभे केले व या क्रमात रोजगार हमी सारख्या योजनांची निर्मिती करण्यास मोठी भूमिका बजावली. शेतमजूर व इतर ग्रामीण श्रमिकांचे किमान वेतनाचे तसेच रोजंदारी श्रमिकांना कायम करण्याचे मोठे संघर्ष यशस्वी केले. संयुक्त महाराष्ट्र आंदोलन ,गिरणी कामगारांचे आंदोलन, सहकारी साखर कारखानदारीच्या भ्रष्टाचाराच्या विरोधी तसेच ऊस तोडणी कामगारांचा संघर्ष, सहकार बचाव आंदोलन, शेतमजुरांचे संघर्ष उभे केले व एक मोठा ठसा महाराष्ट्रामध्ये उमटवला. भाकपा माले लिबरेशन शी लाल निशाण पक्षाच्या नेतृत्वाने ९० साला पासून जाणीवपूर्वक संबंध बांधले. देशातील कष्ट करणाऱ्यांना संघटित करण्यास बांधील होवून त्यांचा राजकीय हस्तक्षेप निर्माण करण्याबाबत मोलाची भूमिका बजावणाऱ्या भाकप माले लिबरेशन पक्षाबरोबरचे हे संबंध व विविध जन आघाड्यांवरील एकत्र काम यामुळे एकीकरणासाठी आवश्यक विश्वास तयार झाला. जमीनदारांच्या विरोधात शेतकऱ्यांच्या बाजूने, दलितांच्या बाजूने मजबुतीने उभे राहून संघर्ष करण्याचा त्यांचा इतिहास आहे. रस्त्यावरचा संघर्ष तसेच निवडणुकांच्या माध्यमातून कष्टकऱ्यांच्या राजकीय हस्तक्षेपाची ताकद वाढवणे यात ते मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहेत. सध्या बिहारमध्ये त्यांचे १२ आमदार असून दोन खासदारही मागच्या लोकसभेच्या निवडणुकीत निवडून आलेले आहेत, झारखंड राज्यात झालेल्या निवडणुकीत सुद्धा त्यांचे तीन आमदार विजयी झाले आहेत.मोदींच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने २०१४ पासून सत्ता स्थापन केली तेव्हापासून त्यांच्या लोकशाही विरोधी धोरणाच्या विरोधात जोरदार संघर्ष भाकप माले लिबरेशन पक्षाकडून केला जात आहे व इंडिया आघाडी तयार करण्यात त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे. भाकप माले लिबरेशन पक्षाशी संबंधित असलेली विद्यार्थी संघटना आयसा, यांनी जे एन यु मध्ये चालवलेला संघर्ष हा सर्व ज्ञात आहे. अशा प्रकारे देशातील विविध भागात तरुण पिढी डाव्या चळवळी मध्ये आणण्यात ते महत्वपूर्ण भागीदारी करीत आहेत.

या जुटीमुळे फासिझम विरोधी संघर्ष व लोकशाही बळकटीकरण व रक्षण याला मोठी ताकद मिळेल व डाव्या चळवळीचे बळकटी करण होईल अशी अपेक्षा लाल निशाण पक्षाच्या मध्यवर्ती समितीच्या वतीने कॉ.उदय भट,कॉ.बाळासाहेब सुरुडे,कॉ.आनंदराव वायकर,कॉ.राजेंद्र बावके,कॉ.शरद संसारे,कॉ.मदिना शेख,,कॉ.जीवन सुरुडे,कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात केली आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
26.1 ° C
26.1 °
26.1 °
86 %
2.9kmh
100 %
Tue
26 °
Wed
30 °
Thu
30 °
Fri
31 °
Sat
30 °

Most Popular

error: Content is protected !!