Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरदत्तनगर ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात; घरकुल योजना ठरली केंद्रबिंदू, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर संतप्त चर्चा

दत्तनगर ग्रामसभा वादाच्या भोवऱ्यात; घरकुल योजना ठरली केंद्रबिंदू, पारदर्शकतेच्या मुद्द्यावर संतप्त चर्चा

श्रीरामपूर (प्रतिनिधी): श्रीरामपूर तालुक्यातील दत्तनगर ग्रामपंचायतीची नुकतीच पार पडलेली ग्रामसभा अत्यंत वादग्रस्त आणि चोखंदळ ठरली. या सभेत गावाच्या विकासासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा झाली, मात्र प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत राबवण्यात येणाऱ्या घरकुल योजनेतील अपारदर्शकता व आर्थिक शोषण या मुद्द्याने संपूर्ण लक्ष वेधून घेतले. लाभार्थ्यांकडून घेतले जाणारे ४५ हजार रुपये, निधीचे अपूर्ण व असमाधानकारक विवरण, तसेच जबाबदार अधिकाऱ्यांच्या भूमिकेवर तीव्र प्रश्न उपस्थित करत ग्रामस्थांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवल्या.

दत्तनगरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत सुमारे १०१ लाभार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. शासनामार्फत प्रत्येकी २.१० लाख रुपयांचे अनुदान मिळण्याची तरतूद असून. मात्र प्रत्यक्षात लाभार्थ्यांकडून प्रत्येकी ४५ हजार रुपये अधिक घेतले जात असल्याचा गंभीर आरोप ग्रामसभेत करण्यात आला. काही लाभार्थिनींनी आपली कुचंबणा मांडताना सांगितले की, “घर मिळण्याची आशा होती, पण आता कर्ज काढावे लागले, दागिने मोडावे लागले.” या आरोपांनी ग्रामसभेचं वातावरणच चिघळले. ग्रामस्थांचा रोष इतका प्रचंड होता की अनेक महिलांनी व्यथा मांडताना डोळ्यांत अश्रू धरले. “योजना गरीबांसाठी आहे की त्यांना अधिक गरिब बनवण्यासाठी?” असा थेट सवाल उपस्थित करण्यात आला. यातूनच घरकुल योजना लाभापेक्षा त्रासदायक ठरत असल्याचे चित्र स्पष्ट झाले.

दत्तनगरला २००८ साली स्व. जयंतराव ससाणे यांच्या पुढारकारात महसूल गावाचा दर्जा मिळून दत्तनगर ग्रामपंचायत स्थापन करण्यात आली त्यानंतर खऱ्या अर्थाने गावच्या विकासाला चालना मिळाली असून १५ एकर गावठाणासाठी शासनाची मंजुरी मिळाली आहे. त्या जागेवर आरोग्य केंद्र, अंगणवाड्या, सांस्कृतिक भवन, जलस्रोत, रस्ते, शाळा अशा विविध सुविधा प्रस्तावित आहेत. मात्र या जमिनीवर घरकुल उभारणी करताना स्थानिक प्रशासन, ग्रामपंचायत आणि निवडलेल्या ठेकेदारांमध्ये आवश्यक समन्वय नसल्याचे दिसून आले. कंत्राटदाराची निवड प्रक्रिया, निधीचा हिशेब, लाभार्थ्यांकडून घेतलेले पैसे याविषयी कोणतीही स्पष्टता नाही, ही ग्रामसभेतील मुख्य तक्रार ठरली.

ग्रामसभेत गावाचे पहिले सरपंच पी.एस. निकम यांनी अभ्यासपूर्वक भूमिका घेत “ही योजना गरजूंसाठी आहे, सत्ताधाऱ्यांच्या निकटवर्तीयांसाठी नाही,” असे स्पष्टपणे सांगितले. माजी जिल्हा परिषद सदस्य बाबासाहेब दिघे यांनी “वाढीव पैसे न घेता ही योजना राबवली पाहिजे, अन्यथा ही योजना विनाकारण ही गरिबांची मजबुरी ठरेल,” असा इशारा दिला. सामाजिक कार्यकर्ते अशोक लोंढे यांनी घरकुलाचे पत्रा छप्पर ऐवजी सॉलिड स्लॅबने बांधकाम व्हावे, अशी मागणी केली. “टिकाऊ घरकुल देणे ही फक्त घोषणा नव्हे, तर प्रशासनाची जबाबदारी आहे,” असं त्यांनी ठणकावलं.
भीमशक्तीचे जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी गरजू लोकांच्या हक्काचा विचार करत, कमी खर्चात अधिक सुविधा मिळाव्यात यासाठी नानासाहेब शिंदे यांनी पुढाकार घ्यावा असे मत मांडले. रिपब्लिकन पक्षाचे विभागीय अध्यक्ष भिमराज बागुल यांनी रस्ते, गटारी, वीज दिवे यावर भर देत या प्रश्नांकडे प्रशासनाचे लक्ष वेधले.

घरकुल योजनेप्रमाणेच जलजीवन योजनाही चर्चेचा विषय ठरली. माजी सदस्य सुरेश जगताप आणि मोहन आव्हाड यांनी योजनेच्या अंमलबजावणीत झालेल्या विलंबाबद्दल संताप व्यक्त करत, संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांना गावात पाय ठेवू दिला जाणार नाही, असा इशारा दिला. प्रेमचंद कुंकुलोळ यांनी अन्य गावांच्या तुलनेत दत्तनगरमध्ये जलजीवन योजनांमध्ये झालेल्या कमी प्रगतीबाबत चिंता व्यक्त केली.

त्याचप्रमाणे माजी सदस्य किरण खंडागळे यांनी गावातील तरुणांमध्ये वाढत असलेली गुन्हेगारी रोखण्यासाठी मार्गदर्शन शिबिरे घेण्याची गरज व्यक्त केली. हिरामन जाधव यांनी करवाढीविरोधात आक्रमक भूमिका घेत स्थानिक प्रशासनाकडून जनतेला गोंजारण्याऐवजी माहितीपूर्वक करप्रणाली राबवण्याची गरज सांगितली. ग्रामपंचायत सदस्य नानासाहेब शिंदे यांनी ग्रामसभेत सुरुवातीला घरकुल योजनेच्या संदर्भात आपले प्रयत्न सांगितले. “मी अनेक लाभार्थ्यांसाठी प्रयत्न केले, आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे सहकार्य लाभले,” असे त्यांनी नमूद केले.

माजी सरपंच रविंद्र गायकवाड यांनी राजकीय भेद विसरून एकत्र येण्याची गरज अधोरेखित केली. “घरकुल योजना कोणाच्या मालकीची नाही, ती गावाची आहे,” हे त्यांनी ठामपणे सांगितले. संदीप बागुल यांनी “नवीन विकास प्रकल्प येणार असून सर्वांनी मिळून काम केल्यासच हे शक्य होईल,” अशी आशा व्यक्त केली. ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच सौ. सारिका कुंकुलोळ होत्या. त्यांनी संयम राखत उपस्थित अधिकारी, कर्मचारी, सेविका यांचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने सभेचा समारोप केला. “घरकुल संदर्भात ग्रामपंचायतीकडे कोणताही ठराव झाला नसून, याविषयी चौकशी करून उत्तर दिले जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
scattered clouds
26.5 ° C
26.5 °
26.5 °
81 %
1.5kmh
41 %
Wed
31 °
Thu
31 °
Fri
30 °
Sat
28 °
Sun
31 °

Most Popular

error: Content is protected !!