श्रीरामपूर (प्रतिनिधी) – महाराष्ट्र राज्य शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, जलसंपदा मंत्री अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत हद्दीतील मालमत्ताधारकांसाठी मालमत्ता करावरील शास्ती माफ करण्यासाठी ‘अभय योजना’ सुरू केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी श्रीरामपूर शहरातील मालमत्ता धारक नागरिकांनी तात्काळ प्रस्ताव दाखल करावेत, असे आवाहन मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, भाजपचे माजी नगरसेवक रवी पाटील व भाजपचे माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी केले आहे.
केतन खोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्य शासनाने लागू केलेल्या अभय योजनेनुसार, नगरपरिषद हद्दीतील शास्ती माफ करण्याचा अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला असून, ते ५०% पर्यंत शास्ती माफ करण्याचा निर्णय ३० दिवसांच्या आत घेणार आहेत. जर शास्ती ५०% पेक्षा अधिक माफ करायची असल्यास, जिल्हाधिकाऱ्यांनी संबंधित प्रस्ताव आपला अभिप्राय देऊन आयुक्त तथा संचालक, नगर परिषद प्रशासन संचालनालयाकडे पाठवावा लागतो. त्यानंतर आयुक्त राज्य शासनाकडे प्रस्ताव सादर करतील व अंतिम निर्णय शासन स्तरावर घेतला जाईल. या योजनेचा अधिकाधिक लाभ श्रीरामपूरच्या नागरिकांनी घ्यावा, यासाठी शहरातील नागरिकांनी लवकरात लवकर आपले शास्ती माफीचे प्रस्ताव श्रीरामपूर नगरपरिषद येथे सादर करावेत, असेही आवाहन करण्यात आले आहे.

या उपक्रमासाठी भाजपचे बाळासाहेब हरदास, भैय्या भिसे, राहुल पांढरे, विजय पाटील, किरण उइके, विशाल रुपनर, कार्तिक मंडवे, सिध्दांत पाटील, सोमनाथ लाड, विशाल पाटील, नवनाथ पवार, चंदनशेठ जुनी, सागर म्हस्के आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी सहकार्य करत नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. राज्य शासनाच्या या महत्त्वाकांक्षी योजनेमुळे अनेक नागरिकांना दिलासा मिळणार असून, शास्तीच्या बोजामुळे कर भरता न आलेल्या मालमत्ताधारकांना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे श्रीरामपूरकरांनी या संधीचा लाभ घेऊन प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सर्व भाजप कार्यकर्त्यांनी केले आहे.