श्रीरामपूर (प्रतिनिधी) – भारतीय जनता पक्षाच्या उत्तर नगर जिल्हाध्यक्षपदी नितीन दिनकर यांची दुसऱ्यांदा फेरनिवड करण्यात आली असून, ही निवड संघटनात्मक बळकटीसोबतच श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात नव्या राजकीय समीकरणांना जन्म देणारी ठरत आहे. पक्षातील वरिष्ठ नेतृत्व, कार्यकर्ते आणि स्थानिक जनतेमध्ये या निर्णयाचे मोठ्या प्रमाणात स्वागत होत असून, श्रीरामपूरच्या राजकारणात नितीन दिनकर हे ‘नवे अवलिया’ म्हणून उदयास येत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.
गेल्या अनेक वर्षांपासून श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात विकासाच्या दृष्टीने सातत्याने दुर्लक्ष होत आले आहे. ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा अभाव, तरुणांतील बेरोजगारी, महिला सुरक्षेच्या समस्या आणि शेतीविषयक प्रश्नांवर केवळ घोषणांचे शासन चालवले गेले. मात्र, नितीन दिनकर यांनी या सर्व समस्या हेरून त्यावर ठोस उपाययोजना करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मतदारसंघातील गावोगाव जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत, त्यांच्या अडचणी शासनदरबारी प्रभावीपणे मांडल्या. विशेषत: शेतकरी, तरुण आणि महिला वर्गासाठी त्यांनी विशेष मोहिमा राबवल्या. शहराच्या इतिहासात एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा. चार दशके जुनी ही मागणी शेवटी नितीन दिनकर यांच्या प्रयत्नातून साकार होत आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि तालुका अध्यक्ष दीपक अण्णा पठारे यांच्या सहकार्याने या विषयावर पाठपुरावा केला आणि अखेर पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते पुतळ्याचे भूमिपूजन पार पडले. ही घटना श्रीरामपूरकरांच्या स्वाभिमानाचा प्रतीक ठरली आहे.

याशिवाय, श्रीरामपूर शहरातील पाणीटंचाईचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित होता. नितीन दिनकर यांनी या समस्येवर अभ्यास करून १७८ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासन दरबारी मांडला आणि त्यास मंजुरी मिळवून दिली. ही योजना शहराच्या पाणीप्रश्नावर कायमस्वरूपी तोडगा ठरू शकते. केवळ नागरी सुविधा नाही, तर युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठीही त्यांनी ठोस पावले उचलली आहेत. श्रीरामपूर MIDCमध्ये उद्योगांची स्थापना करून स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी त्यांनी उच्चस्तरीय बैठका घेतल्या असून, त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळतो आहे.
पक्षसंघटना मजबूत करण्याच्या दृष्टीनेही नितीन दिनकर यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांच्या पुनर्नियुक्तीमुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपची ताकद अधिक वाढेल, असा विश्वास पक्षांतर्गत व्यक्त केला जात आहे. मतदारसंघात त्यांच्या नावाभोवती निर्माण झालेला विश्वास, गावागावातील सक्रिय उपस्थिती आणि सातत्याने सुरु असलेली विकासाभिमुख कामगिरी यामुळे ते भविष्यात लोकप्रतिनिधी म्हणूनही आघाडीवर राहू शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी असलेली त्यांची जवळीक ही नितीन दिनकर यांच्या राजकीय प्रवासातील एक महत्त्वाची बाजू आहे. त्यांच्या माध्यमातून त्यांनी अनेक योजनांसाठी जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात निधी आणला असून, कोणत्याही संविधानिक पदावर नसतानाही ते सातत्याने जनतेच्या प्रश्नांना शासनदरबारी आवाज देतात.
सामाजिक बांधिलकीही त्यांच्या कार्यात स्पष्टपणे दिसून येते. विविध सामाजिक उपक्रम, मदतकार्य, युवा सशक्तीकरण यामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यामुळे नितीन दिनकर हे केवळ राजकारणी नाहीत, तर एक प्रभावी आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून समोर येत आहेत. त्यांच्या या नेतृत्वगुणांमुळे आणि विकासाभिमुख दृष्टिकोनामुळे श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाला नव्या उंचीवर नेण्याचे सामर्थ्य त्यांच्या ठायी आहे. नितीन दिनकर यांची जिल्हाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड ही केवळ त्यांच्या कामगिरीची पोचपावती नसून, येणाऱ्या काळात श्रीरामपूरच्या राजकीय नकाशावर नवीन अध्याय रेखाटणारी ठरणार आहे, यात शंका नाही.