श्रीरामपूर/प्रतिनिधी :– शहरातील नागरिकांसाठी चिंतेची बाब ठरलेली पाणीपुरवठा व्यवस्था नुकत्याच एका अनपेक्षित संकटामुळे डळमळीत झाली आहे. शहराच्या पाणी साठवण तलावात सुरू असलेल्या कामादरम्यान अचानक भगदाड पडल्याने तीन दिवसांच्या पाणीसाठ्याचा अपव्यय झाला. या प्रकारामुळे शहरात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, या संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरातील राजकीय व सामाजिक कार्यकर्ते, तसेच प्रशासकीय यंत्रणा एकत्रितपणे परिस्थिती हाताळण्यास सज्ज झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावेळी भाजपच्या माजी नगरसेवकांनी साठवण तलावावर मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांची भेट घेत पाण्याच्या नियोजनाबाबत माहिती घेतली. मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष केतन खोरे, माजी नगरसेवक रवी पाटील, माजी नगरसेवक दीपक चव्हाण यांनी सांगितले की, “शहरात पाण्याची टंचाई भासू नये म्हणून रोटेशनने पाणीपुरवठा करण्याची योजना आखली जाईल. त्यासाठी आवश्यक असल्यास भाजपचे पदाधिकारी जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विनंती करुन श्रीरामपूरला रोटेशन सोडण्याची विनंती करू अशी माहिती दिली.

श्रीरामपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी मच्छिंद्र घोलप यांनी देखील परिस्थितीवर तात्काळ लक्ष घालून संबंधित विभागांशी समन्वय साधला आहे. पाणीपुरवठा अधिकारी अरविंद मराठे, बांधकाम विभागाचे अधिकारी सूर्यकांत गवळी आणि पाणीपुरवठा तंत्रज्ञ नीलेश बकाल यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यांनी भगदाड कसे आणि का पडले, याचा तपशीलवार अहवाल तयार करण्याचे काम सुरु केले आहे. यासोबतच तातडीने पर्यायी व्यवस्था उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. या प्रकारामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाजपचे शहर सरचिटणीस रवि पंडित, बाळासाहेब हरदास, विशाल रुपनर आणि राहुल पांढरे यांनीही चिंता व्यक्त केली.

सध्या शहरात पाणी रोटेशनच्या आधारे पाणीपुरवठा करण्याच्या पर्यायावर विचार सुरू असून, यामध्ये विविध भागांमध्ये विशिष्ट वेळेत मर्यादित पाणीपुरवठा केला जाईल. ही व्यवस्था लागू करताना नागरिकांनी सहकार्य करणे अत्यावश्यक असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. पाणी साठवणूक व वापर यावर शिस्त लावल्यास शहरात तात्काळ टंचाई भासणार नाही, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे. शहरातील सामाजिक संस्था, स्थानिक नागरिक आणि राजकीय प्रतिनिधी यांनी एकत्रितपणे या संकटात मदतीसाठी पुढाकार घेतला आहे.