Homeमहाराष्ट्रअहिल्यानगरभाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीत मोठा बदल! वयोमर्यादा, पात्रता निकषांनी इच्छुकांची परीक्षा

भाजपच्या जिल्हाध्यक्ष निवडीत मोठा बदल! वयोमर्यादा, पात्रता निकषांनी इच्छुकांची परीक्षा

४५ ते ६० वयोगटाची अट, नवख्यांना संधी नाही; जुन्या-नव्या कार्यकर्त्यांतील वादावर पक्षाने काढला तोडगा

अहिल्यानगर/प्रतिनिधी:– भारतीय जनता पक्षाने जिल्हाध्यक्ष पदासाठी यंदा प्रथमच कठोर निकष लागू करत निवड प्रक्रियेत मोठा बदल केला आहे. संघटना सशक्त करण्याच्या दृष्टीने आणि निष्ठावान, अनुभवी कार्यकर्त्यांना प्राधान्य देण्यासाठी पक्षाने ४५ ते ६० वर्षांदरम्यानची वयोमर्यादा निश्चित केली आहे. यासोबतच नव्याने प्रवेश केलेले कार्यकर्ते, आमदार किंवा खासदारांना जिल्हाध्यक्षपदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. संपूर्ण महाराष्ट्रभर ही प्रक्रिया नव्या निकषांनुसार राबवली जात असून, भाजपने यंदाचे वर्ष ‘संघटन पर्व’ म्हणून घोषित केले आहे.सदस्य नोंदणी पूर्ण झाल्यानंतर सध्या मंडलाध्यक्ष व जिल्हाध्यक्ष पदांची निवड प्रक्रिया सुरु आहे. रविवारी शिर्डी येथे मंत्री जयकुमार रावल व निरीक्षक लक्ष्मण सावजी (अहिल्यानगर महानगर), आमदार विक्रमसिंह पाचपुते (अहिल्यानगर उत्तर) आणि बाळासाहेब सानप (अहिल्यानगर दक्षिण) यांच्या उपस्थितीत जिल्हा निवड प्रक्रियेत नवे निकष लागू करत कार्यवाही झाली. यानंतरचा अहवाल प्रदेश छाननी समितीकडे पाठवण्यात येणार असून, लवकरच नव्या जिल्हाध्यक्षांची नावे जाहीर होणार आहेत.

नवीन प्रणालीत इच्छुक उमेदवाराने संघटनेत पूर्वी कोणत्यातरी जबाबदारीच्या पदावर काम केलेले असणे बंधनकारक आहे. तसेच, किमान दोन कार्यकाळ सक्रिय सदस्यत्व असणे, अनुशासित व प्रामाणिक वर्तन, महिला व अनुसूचित जाती-जमातींच्या प्रतिनिधींची शिफारस मंडल पातळीवरून येणे गरजेचे आहे. यापूर्वी निवड प्रक्रियेत इच्छुकांच्या थेट मुलाखती घेतल्या जात असत, परंतु यंदा मुलाखती रद्द करून शिफारसीच्या माध्यमातून प्रक्रिया राबवली जात आहे. ठराविक पदाधिकाऱ्यांना शिफारस करण्याचा अधिकार दिला असून, उमेदवार योग्य का आहे हे शिफारस प्रपत्रात स्पष्ट नमूद करणे बंधनकारक आहे. शिफारस करणाऱ्यांमध्ये राष्ट्रीय व प्रदेश पदाधिकारी, कोअर ग्रुप सदस्य, संघटन मंत्री, मोर्चा पदाधिकारी, माजी व विद्यमान खासदार-आमदार, विधानसभा लढवलेले उमेदवार, विद्यमान जिल्हाध्यक्ष, सरचिटणीस, प्रकोष्ट पदाधिकारी व प्रवासी कार्यकर्ते यांचा समावेश आहे. भाजपमध्ये अलीकडील काळात इतर पक्षांतून अनेक नेते व कार्यकर्ते सामील झाले आहेत. त्यामुळे पदांच्या वाटपावरून नव्याजुन्यांमध्ये संघर्ष निर्माण झाला होता. या पार्श्वभूमीवर निष्ठावान व संघटनेशी जुडलेले कार्यकर्तेच जिल्हाध्यक्ष पदासाठी पात्र ठरावेत यासाठी हे निकष तयार करण्यात आले आहेत. यामुळे जुन्या व निष्ठावान कार्यकर्त्यांना न्याय मिळेल, असे काही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

महानगर जिल्हाध्यक्ष पदासाठी सचिन पारखे, बाबासाहेब वाकळे व बाबासाहेब सानप; दक्षिण जिल्हाध्यक्ष पदासाठी दिलीप भालसिंग, युवराज पोटे, अशोक खेडकर, रवी सुरवसे, बाळासाहेब महाडिक व सचिन पोटरे; तर उत्तर जिल्हाध्यक्ष पदासाठी नितीन दिनकर, जालिंदर वाकचौरे, शिवाजी गोंदकर व नितीन कापसे ही नावे चर्चेत आहेत. मात्र, अंतिम निवड ही पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांची शिफारस कोणाला मिळते यावरही मोठ्या प्रमाणात अवलंबून राहणार आहे. अहिल्यानगरातील तीनही जिल्हाध्यक्ष पदांसाठी या नव्या अटीमुळे अनेक इच्छुक शिफारसीपूर्वीच अपात्र ठरले असून, त्यामुळे इच्छुकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरीही संघटना शिस्तबद्धपणे व निकषांनुसार चालवण्याच्या दिशेने भाजपने पाऊल टाकल्याचे स्पष्ट होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!