श्रीरामपूर (प्रतिनिधी) – जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे नुकत्याच घडलेल्या भीषण दहशतवादी हल्ल्याचा तृतीयपंथी समाज सेवा संस्थेच्या वतीने जोरदार निषेध करण्यात आला आहे. देशाच्या शांतता आणि अखंडतेवर घाला घालणाऱ्या या भ्याड कृत्याचा तीव्र शब्दांत निषेध करणे अत्यावश्यक असल्याचे संस्थेच्या अध्यक्षा पिंकी गुरु शेख यांनी स्पष्ट केले. संस्थेच्या शिष्टमंडळाने तहसीलदार श्रीरामपूर यांना निवेदन सादर करून भारत हा विविधतेतील एकतेचे प्रतीक असल्याचे अधोरेखित केले. प्रत्येक नागरिकाच्या जीवन व सुरक्षिततेचा मूलभूत अधिकार अबाधित राहण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. दहशतवाद्यांच्या या अमानवी कृत्यांचा कोणत्याही स्वरूपात पाठिंबा देऊ नये आणि संबंधित दोषींवर कठोरात कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम मागणी निवेदनात व्यक्त करण्यात आली.
या हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप नागरिकांच्या कुटुंबीयांप्रती तृतीयपंथी समाज सेवा संस्थेच्या वतीने गाढ शोक व्यक्त करण्यात आला असून, त्यांच्या दुःखात संस्थेचे सर्व सदस्य सहभागी असल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेतील पीडितांना न्याय मिळावा यासाठी शासनाने तातडीने कठोर पावले उचलावीत, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.
देशात शांतता आणि सौहार्द टिकवून ठेवण्यासाठी सर्व नागरिकांनी एकत्र येऊन हिंसाचाराचा निषेध करावा आणि देशाच्या एकात्मतेसाठी सक्रिय भूमिका बजवावी, असे आवाहनही निवेदनात करण्यात आले. या घटनेची शासनाने गांभीर्याने दखल घेऊन दोषींना कठोर शिक्षा करून देशवासीयांना सुरक्षिततेचा विश्वास द्यावा, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. यावेळी अध्यक्ष पिंकी गुरु शेख यांच्या नेतृत्वाखाली तनिषा, तनुजा, खुशी, रंगीली, गौरी, पूनम, दामिनी, सई, मायरा, दिशा आदी तृतीयपंथी हे उपस्थित होते.