श्रीरामपूर/प्रतिनिधी – तालुक्यातील सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेले दत्तनगर हे गाव आज गंभीर समस्यांच्या गर्तेत अडकले आहे. 2007 साली स्थापन झालेल्या ग्रामपंचायतीला दोन दशके पूर्ण होत असतानाही, गावाचा सर्वांगीण विकास केवळ कागदावरच मर्यादित राहिल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे. सत्ताधाऱ्यांच्या निष्क्रियतेमुळे आणि घोषणांपुरते मर्यादित राजकारणामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरलेली आहे.
गावातील रस्ते अपुरे आणि तुटक अवस्थेत आहेत, वीजपुरवठा वारंवार खंडित होतो, तर विकासाच्या नावाखाली केवळ घोषणा केल्या जातात. शेजारील MIDC क्षेत्राचा लाभ स्थानिक बेरोजगार तरुणांना न मिळाल्याने रोजगाराच्या संधी मर्यादित राहिल्या आहेत. शिक्षण, आरोग्य, स्वच्छता यासारख्या मूलभूत सुविधांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचे आरोप वारंवार होत आहेत.
गावासाठी 2025-26 या आर्थिक वर्षात 3 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असली, तरी याआधीच्या निधीच्या वापराबाबतचा अनुभव पाहता, यंदाही तो योग्य पद्धतीने वापरला जाईल का, याबद्दल ग्रामस्थांमध्ये संभ्रम आहे. ज्ञानदीप माध्यमिक शाळेतील विद्यार्थी अजूनही 44 अंशांवर विना-हवाकुंडी वर्गांमध्ये शिक्षण घेत आहेत. गावात खेळाचे मैदान नाही, स्वच्छतागृहांची संख्या अत्यंत अपुरी आहे, आणि अस्वच्छतेमुळे आरोग्य धोक्यात आले आहे.
दरम्यान, 2025-2030 या पंचवार्षिक कार्यकाळासाठी सरपंच पदाच्या आरक्षणाची प्रक्रिया पूर्ण झाली असून इच्छुक उमेदवारांमध्ये चढाओढ सुरू झाली आहे. मतदारांवर प्रभाव टाकण्यासाठी विविध प्रयत्न सुरू आहेत. मात्र, यावेळी गावकऱ्यांनी सजग राहून दीर्घकालीन विकासाचा विचार करून मतदान करणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते सागर भोसले यांचे मत आहे.
ग्रामपंचायत सदस्य सागर भोसले यांनी प्रसारित केलेल्या पत्रकात, “दत्तनगरचा विकास केवळ निवडणुकीपुरता न राहता, तो सातत्यपूर्ण आणि वास्तवात उतरलेला असावा,” अशी स्पष्ट भूमिका मांडली आहे. “वेळ आहे कृतीची, सजग निवडीची आणि खऱ्या परिवर्तनाची,” असा संदेश देत त्यांनी ग्रामस्थांना सजग राहण्याचे आवाहन केले आहे. दत्तनगरच्या भविष्याचे गणित हे सध्या केवळ राजकीय समीकरणांवर आधारित न राहता, प्रत्यक्ष कृतीवर अवलंबून राहिले आहे. आता गावात खरे परिवर्तन घडवायचे असेल, तर आश्वासनांपलीकडे जाऊन कृतीशील नेतृत्वाची निवड करण्याची ही योग्य वेळ आहे.