आश्वी (प्रतिनिधी) : देशभर वक्फ बोर्डाच्या विरोधात आवाज उठत असताना, त्या संदर्भातील ठरावावर संसदेत विरोध करणाऱ्या खासदारांना गावबंदी करण्यात येत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनीही ठरावाविरोधात मतदान केल्याने त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग यांनी त्यांच्यावर गावबंदीची ठाम मागणी करत तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे.राहाता तालुक्यातील गोगलगाव येथे आयोजित श्री हनुमान जन्मोत्सव सोहळ्याच्या प्रसंगी सागर बेग बोलत होते. या वेळी माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रदीप मगर, नाना गायकर, योगेश महाराज कांदळकर, रोहिणीताई राऊत, प्रवरा कारखान्याचे संचालक रामप्रसाद मगर, संतोष चव्हाण, पंकज जाधव, नामदेव पांढरकर, बाळासाहेब धुळसुंदर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
सागर बेग म्हणाले की, खासदार वाकचौरे यांची भूमिका देशविघातक व हिंदुविरोधी आहे. देशातील हिंदू समाजाने ज्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना निवडून दिले, तेच खासदार जर वक्फ बोर्डासारख्या कायद्यांच्या बाजूने उभे राहत असतील, तर त्यांना त्यांच्या मतदारसंघात येऊ देऊ नये. अशा खासदारांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे, असे स्पष्ट वक्तव्य त्यांनी केले.ते पुढे म्हणाले, “राजकारण वेगळं ठिकाणी असो, पण हिंदू धर्मावर संकट आल्यास सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. धर्माच्या आस्थेचा प्रश्न असेल तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून एकसंघपणे लढायला हवे.” त्यांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत सांगितले की, काँग्रेसच्या काळात हिंदुविरोधी आणि देश पोखरणारे कायदे अस्तित्वात आले. केंद्र शासन सध्या अशा कायद्यांचे उच्चाटन करत असताना, हिंदू मतांवर निवडून आलेले प्रतिनिधी त्याविरोधात भूमिका घेत असतील, तर अशांचा निषेध होणे गरजेचे आहे.
सागर बेग यांनी पुढे सांगितले की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत श्रीरामपूर मतदारसंघातून प्रामाणिकपणे हिंदू धर्मासाठी उभा असलेल्या उमेदवाराला पाठिंबा देण्याची मागणी सकल हिंदू समाजाने केली होती. मात्र राजकीय स्वार्थामुळे त्या मागणीकडे दुर्लक्ष झाले, आणि त्यामुळे जिहादी विचारसरणीला खतपाणी मिळाले. “मी अपक्ष उमेदवारी केली आणि केवळ हिंदू मतदारांनीच मला पन्नास हजारांहून अधिक मते दिली,” असेही त्यांनी ठामपणे नमूद केले. या कार्यक्रमात सागर बेग यांनी हिंदू समाजाच्या एकतेचा पुनरुच्चार करत सर्वसामान्य जनतेला हिंदू धर्माच्या रक्षणासाठी सज्ज होण्याचे आवाहन केले. त्यांच्या रोखठोक भाषणाने कार्यक्रमात उपस्थित सर्वांची दखल घेतली गेली.