नेवासा/प्रतिनिधी – श्री समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या नेवासा बुद्रुक येथील दक्षिणमुखी मारुती मंदिरात शनिवारी पहाटे ६ वाजता पुष्पवृष्टी करत “हनुमंतराय”चा जन्मोत्सव अत्यंत भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. “राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की” अशा गजरांनी परिसर दुमदुमून गेला. या पावन प्रसंगी श्री गाडगेबाबा भजनी मंडळाच्या वतीने गणेश महाराज दरंदले यांच्या मार्गदर्शनाखाली ह.भ.प. सौ. रंजनाताई भाकरे, सौ. कमलताई कराळे, सौ. स्वाती रहाट, ह.भ.प. सखाराम बाबा शिंदे, केशव महाराज डौले, गोकुळनाना जायगुडे आदी सेवेकऱ्यांनी भावपूर्ण भजने सादर केली.
जन्मोत्सवानिमित्त मंदिराचे अध्यक्ष गंगाभाऊ शिंदे व सचिव अँड. वसंतराव नवले यांच्या हस्ते श्री हनुमंतरायांचा अभिषेक करण्यात आला, तर भक्त संतोष चांदणे यांच्या हस्ते जन्माची आरती करण्यात आली. या धार्मिक विधीचे पौरोहित्य ग्रामपुरोहित लाला गुरु जोशी यांनी केले. सकाळी पहाटे झालेल्या या उत्सवात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली, तर मंदिरावर सजवलेली भव्य विद्युत रोषणाई भाविकांचे आकर्षण ठरली. सेवेकरी विजय सुरोशे, किशोर गावडे व गोरक्ष कुटे यांच्या वतीने सर्व भाविकांना शिरा प्रसाद व केळी-साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले.
उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष गंगाभाऊ शिंदे, सचिव अँड. वसंतराव नवले, खजिनदार व माजी सरपंच दादासाहेब कोकणे, विश्वस्त धनंजय डहाळे, शेषराव डौले, राजेंद्र मारकळी, संभाजी बेद्रे, भानुदास रेडे, सौ. लताताई बोरकर, सुनील डोहोळे, पुजारी भाऊ दाणे, सेवेकरी सुनील डहाके, किशोर गारुळे आदींनी विशेष परिश्रम घेतले. या सोहळ्यासाठी पहाटेपासूनच भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी झाली होती. सर्व भाविकांचे अध्यक्ष गंगाभाऊ शिंदे यांनी स्वागत केले तर अँड. नवले यांनी उपस्थितांचे आभार मानले. हनुमंतरायाचा जन्मोत्सव भक्ती, श्रद्धा आणि उत्साहात संपन्न झाल्याने परिसरात पावित्र्याचे वातावरण निर्माण झाले होते.
