Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूरच्या तलाठी कार्यालयात महिलांची झुंबडगोंधळ

श्रीरामपूरच्या तलाठी कार्यालयात महिलांची झुंबडगोंधळ

संजय गांधी निराधार योजनेसाठी हायतीच्या दाखल्यावरून गोंधळ, प्रशासनाचे अपयश उजेडात

श्रीरामपूर – संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ योजनेसाठी आवश्यक असलेल्या ‘हायतीच्या दाखल्यावरून’ आज श्रीरामपूरच्या तलाठी कार्यालयात प्रचंड गोंधळ उडाला. महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली. काही महिलांमध्ये वाद, हाणामारीही झाली. योग्य नियोजनाचा व मार्गदर्शनाचा अभाव यामुळे लाभार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. तहसील कार्यालयाने ‘हायतीच्या दाखल्यासाठी’ तीन महिन्यांची मुदत दिली असून नागरिकांनी घाई न करता नियमानुसार प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन वेळोवेळी करण्यात आले आहे.

मात्र, प्रशासनाकडून ठोस आणि प्रभावी माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जात नसल्याने नागरिक संभ्रमात असून तलाठी कार्यालयात अनावश्यक गर्दी करत आहेत.योजनेच्या लाभासाठी आवश्यक असलेला ‘हायतीचा दाखला’ आता केवळ एका पानाचा आहे. तरीही काही झेरॉक्स दुकानदार जुना तीन पानी दाखला देत असल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच तलाठी कार्यालयाकडून फक्त उत्पन्न आणि रहिवाशी दाखल्यांची पूर्तता करायची असून इतर काही प्रक्रिया तहसील कार्यालयात होणार आहे. दरम्यान, आधार कार्ड सीडिंगच्या गोंधळामुळे अनेक महिलांचे पैसे अजून खात्यात जमा झाले नसून त्यामुळेही महिलांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. यामुळे महिलांची धावपळ वाढली असून गरज नसतानाही तलाठी कार्यालयात गर्दी होत आहे.

तहसील आणि तलाठी कार्यालयाकडून योजनेबाबत स्पष्ट माहिती देणारे बोर्ड लावणे अत्यंत गरजेचे ठरत आहे. यामुळे नागरिकांना दिशादर्शन होऊन गोंधळ टाळता येईल. प्रशासनाने लाभार्थी महिलांना समजून सांगण्याचे, योजनांबाबत योग्य आणि वेळेवर माहिती देण्याचे, तसेच गर्दी नियंत्रणासाठी उपाययोजना करण्याचे गांभीर्याने पाऊल उचलणे गरजेचे आहे. अन्यथा अशा गोंधळामुळे योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याऐवजी त्रासदायक ठरण्याची शक्यता आहे.

चौकट

उत्पन्नाचा दाखला आवश्यकतेबाबत लाभार्थ्यांनी आधी खात्री करावी – दत्तात्रय शेकटकर

उत्पन्नाचा दाखला कोणाला आवश्यक आहे याबाबतची यादी सर्व ग्राममहसूल अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे, अशी माहिती महसूल विभागाचे निवासी नायब तहसीलदार दत्तात्रय शेकटकर यांनी दिली आहे. त्यांनी सांगितले की, अनेक शासकीय योजना व लाभांसाठी उत्पन्नाचा दाखला लागतो, मात्र सर्व योजनांसाठी तो बंधनकारक नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी संबंधित योजनेकरिता उत्पन्नाचा दाखला आवश्यक आहे का, याची खात्री आधी करून घ्यावी. “सर्व लाभार्थ्यांनी महसूल कार्यालयात गर्दी न करता, यादीप्रमाणे व आवश्यकता पाहूनच अर्ज करावेत. काही योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला लागत नाही, त्यामुळे अनावश्यक अर्ज टाळावेत,” असे आवाहनही शेकटकर यांनी केले.

RELATED ARTICLES
Jharkhand
moderate rain
25.5 ° C
25.5 °
25.5 °
88 %
0.6kmh
100 %
Tue
27 °
Wed
29 °
Thu
28 °
Fri
32 °
Sat
32 °

Most Popular

error: Content is protected !!