श्रीरामपूर (प्रतिनिधी) : शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या स्थळावरील वाद अधिक चिघळला असून, काँग्रेस पक्षाने याच मुद्द्यावरून नगरपालिकेच्या आवारात आत्मक्लेश आंदोलन केल्यानंतर राजकीय वातावरण आणखी तापले आहे. या आंदोलनावर नगराध्यक्ष मा. संजय फंड व मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत काँग्रेसवर हिंदू मत विभागण्याचा आरोप केला आहे. “हिंदू समाज एकत्र येऊ नये म्हणून काँग्रेसकडून हा अट्टाहास रचला जात आहे,” अशी कठोर टीका नगराध्यक्ष फंड यांनी केली.
नगराध्यक्ष संजय फंड म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा केवळ एका चौकाचा वा राजकीय पक्षाचा विषय नाही, तर तो संपूर्ण श्रीरामपूर शहराच्या अभिमानाचा प्रतीक आहे. या पुतळ्याचे अनावरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे. हे अनावरण श्रीरामपूरकरांसाठी ऐतिहासिक क्षण ठरणार आहे. अशा वेळी काँग्रेसकडून आंदोलन करून जनतेला दिशाभूल करण्याचा आणि हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला जात आहे.”त्यांनी पुढे म्हटले, “काँग्रेसला आज अचानक छत्रपतींची आठवण झाली हेच विनोदी आहे. जे लोक हिंदुत्वावर शंका उपस्थित करत होते, त्यांनाच आता आत्मक्लेशाची आठवण झाली आहे. हे सर्व नाट्य केवळ राजकीय समीकरण साधण्यासाठी आहे. पुतळा कोणत्याही एका चौकाचा नाही, तो श्रीरामपूर शहराचा सन्मान आहे. तीन दशकांपासून या पुतळ्याची प्रतीक्षा शहरवासीय करत आहेत, आणि आता जेव्हा तो क्षण जवळ आला आहे, तेव्हा काँग्रेसला त्याचे राजकारण करायचे आहे.”
मा. जिल्हा परिषद सदस्य शरद नवले यांनीही काँग्रेसवर जोरदार पलटवार केला. ते म्हणाले, “शहरात हिंदू समाज एकत्र येऊ लागला आहे, ही गोष्ट काँग्रेसला अस्वस्थ करते. त्यामुळे ते धार्मिक प्रतीकांवर वाद निर्माण करत आहेत. हे केवळ मतांच्या राजकारणासाठी आहे. काँग्रेसचा उद्देश विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी समाजात मतभेद निर्माण करणे आहे.” त्यांनी पुढे म्हटले, “श्रीरामपूरची जनता जागरूक आहे. ती छत्रपतींच्या आदर्शाशी निष्ठावान आहे. काँग्रेसने शिवरायांच्या नावाने राजकारण करण्यापेक्षा त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन शहराच्या गौरवात भर घालावी.”
नगराध्यक्ष फंड यांनी पुढे सांगितले, “काँग्रेसने आंदोलनाचे रूप आत्मक्लेश म्हणून दाखवले असले तरी, प्रत्यक्षात हा एक राजकीय कार्यक्रम होता. नगरपालिकेच्या आवारात आंदोलन करणे ही लोकशाही पद्धती नव्हे. काँग्रेसचे काही नेते फक्त प्रचाराच्या निमित्ताने छत्रपतींचे नाव वापरत आहेत. शहरातील लोकांनी त्यांच्या हेतूला ओळखले आहे.”दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या नेत्यांनी मात्र आपल्या आंदोलनाचे समर्थन करत “शिवाजी चौक” या मूळ नियोजित स्थळावरच पुतळा बसविण्याची मागणी कायम ठेवली आहे. परंतु भाजपाकडून मात्र या मागणीला राजकीय उद्देश असल्याचा आरोप केला जात आहे. भाजपाच्या म्हणण्यानुसार, पुतळा सध्याच्या स्थळी – भाजी मंडई परिसरात – बसविल्याने वाहतुकीचे नियोजन सुकर राहील आणि नागरिकांना सोयीचे ठरेल.शहरात गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावरून सतत चर्चा रंगत आहे. एका बाजूला काँग्रेस ‘मूळ ठिकाणाचा सन्मान राखण्याच्या’ नावाखाली भावनिक वातावरण निर्माण करत आहे, तर दुसरीकडे भाजपा ‘शहराच्या अभिमानाचा’ मुद्दा पुढे करून काँग्रेसवर हिंदू समाजात फूट पाडण्याचा आरोप करत आहे.
या वादामुळे श्रीरामपूरातील राजकीय तापमान चढले असून, येणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा दोन्ही पक्षांसाठी प्रतिष्ठेचा बनला आहे. नागरिकांमध्येही मतभेद निर्माण झाले असून, सोशल मीडियावर या विषयावर तीव्र चर्चा सुरू आहे. काही ठिकाणी नागरिकांनी “शिवाजी महाराज हे सर्वांचे आहेत” असे म्हणत दोन्ही पक्षांनी राजकारण थांबवावे, अशी मागणी केली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हा शहरासाठी अभिमानाचा क्षण असला, तरी त्या भोवती उभा राहिलेला राजकीय कल्लोळ निवडणुकीपूर्व वातावरण आणखी तापवणारा ठरणार, हे निश्चित झाले आहे. श्रीरामपूरची जनता आता या वादात कोणाची भूमिका खऱ्या अर्थाने शिवभक्तीची आणि कोणाची राजकीय अभिनयाची आहे, हे स्वतःच ठरवेल.




