शिर्डी/प्रतिनिधी :- येथील श्री साईबाबा संस्थान ट्रस्टमध्ये अलीकडेच घडलेली एक धक्कादायक घटना साईभक्तांच्या भावनांना जबरदस्त धक्का देणारी ठरली आहे. संपूर्ण जीवन गोरगरिबांच्या सेवेत व्यतीत करणाऱ्या आणि भिक्षेच्या झोळीतून मानवतेचा संदेश देणाऱ्या साईबाबांच्या देणगीत हात घालण्याचा प्रकार थेट सीसीटीव्हीत कैद झाला आहे. साई संस्थानमधील रोकड मोजणी प्रक्रियेदरम्यान एका कर्मचाऱ्याने तब्बल ५० हजार रुपये चोरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे संस्थानात संतापाची लाट उसळली असून, कर्मचाऱ्यांपासून ते साईभक्तांपर्यंत सर्वत्र तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
सीसीटीव्ही फूटेजमध्ये चोरी स्पष्ट दिसून आल्यानंतरही संबंधित कर्मचाऱ्यावर केवळ निलंबनाची कारवाई झाली असून, त्याच्याविरुद्ध कोणताही पोलिस गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. ही बाब संस्थानमधील पारदर्शकतेवर आणि कायद्याच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांशी अर्वाच्च वर्तन आणि आदेश झुगारल्याच्या कारणावरून निलंबन करण्यात आले असले तरी, चोरीसारख्या गंभीर आरोपावर कारवाई न झाल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. “नियम मोडल्यावर निलंबन, पण चोरी केल्यावर माफ?” असा सवाल उपस्थित होत आहे. या कर्मचाऱ्याच्या मागे काही स्थानिक ‘वजनदार’ मंडळी असल्याच्या चर्चा आहेत. त्याला “आपला माणूस” म्हणून वाचवण्यासाठी काही मंडळींनी हस्तक्षेप केल्याची माहिती मिळत आहे. संबंधित कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत असून, स्थानिक ओळखींचा आधार घेत स्वतःची दहशत कायम ठेवत असल्याचे आरोप होत आहेत. संस्थानमधील काही कर्मचारी अशाच पद्धतीने बदल्यांना विरोध करून एकाच जागी ‘स्थायिक’ झाले असल्याचा मुद्दा या निमित्ताने पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

संस्थेच्या आतली परिस्थिती इतकी बिघडली आहे की, या प्रकरणावर कोणीही थेट बोलण्यास तयार नाही. “जो बोलेल, त्याचे कान कापले जातील” अशा शब्दांत कर्मचाऱ्यांची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे संस्थानमध्ये दबावाखाली कामकाज चालत असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. काही कर्मचारी वरिष्ठांच्या निर्देशांना न जुमानता उर्मटपणे वागत असल्याने शिस्तीचा संपूर्ण बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. या प्रकारामुळे साईभक्तांमध्ये तीव्र असंतोष आहे. बाबांच्या झोळीतून चोरी हा बाबांच्या कार्याचा अपमान असल्याचे भावनिक मत अनेक भक्तांनी मांडले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्याकडून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित कर्मचाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. फक्त निलंबन नव्हे, तर चोरीचा गुन्हा दाखल करून सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करणे आवश्यक असल्याचे साईभक्तांचे म्हणणे आहे.
साई संस्थान हे देशभरातील एक अत्यंत श्रद्धास्थान आहे. दररोज लाखो रुपये देणगी म्हणून संस्थानात जमा होतात, जी गरजूंना मदतीसाठी वापरण्यात येते. अशा ठिकाणी कर्मचारीच चोरी करत असतील, आणि त्यांच्यावर पाठीशी घालणारेही कार्यरत असतील, तर संस्थानची विश्वासार्हता आणि साईबाबांच्या कार्याची पावित्रता धोक्यात येते. त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणात कठोर भूमिका घेत, दोषींवर त्वरित आणि पारदर्शक पद्धतीने कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. साईबाबा ‘गुरुवारी दंडा फिरवतात’ अशी श्रद्धा आहे. त्यांच्या झोळीत हात घालणाऱ्याला बाबा कधीच माफ करत नाहीत, असा इतिहास साक्ष देतो. त्यामुळे चोरी करणाऱ्यांवर आणि त्यांना पाठीशी घालणाऱ्यांवरही लवकरच न्याय होईल, अशी श्रद्धा साईभक्त व्यक्त करत आहेत. ही घटना भविष्यात साई संस्थानसाठी एक धडा ठरेल आणि संस्थान व्यवस्थापनाला अधिक पारदर्शक आणि शिस्तबद्ध बनवेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.