Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरसमता नागरी पतसंस्थेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप; श्रीरामपूर शाखेत ठेवी काढण्यासाठी सभासदांची झुंबड

समता नागरी पतसंस्थेवर आर्थिक गैरव्यवहाराचे आरोप; श्रीरामपूर शाखेत ठेवी काढण्यासाठी सभासदांची झुंबड

श्रीरामपूर/ प्रतिनिधी : कोपरगाव येथील राजकीय व सामाजिक क्षेत्रात परिचित असलेले काका कोयटे यांच्या नेतृत्वाखालील समता नागरी पतसंस्था सध्या गंभीर आरोपांच्या भोवऱ्यात सापडली असून, आर्थिक गैरव्यवहार व घोटाळ्याच्या चर्चेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पतसंस्थेच्या काही कर्जदारांनी थेट गैरव्यवहाराचे आरोप केल्याने या प्रकरणाचे पडसाद आता थेट ठेवीदारांपर्यंत पोहोचले असून, त्यांच्या कष्टाने साठवलेली रक्कम सुरक्षित आहे की नाही, याबाबत तीव्र संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. या आरोपांचा सर्वाधिक परिणाम श्रीरामपूर येथील समता नागरी पतसंस्थेच्या शाखेवर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पतसंस्थेविषयी सुरू असलेल्या नकारात्मक चर्चांमुळे आणि आर्थिक घोटाळ्याच्या आरोपांमुळे ठेवीदारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, त्याचा थेट परिणाम व्यवहारांवर झाला आहे. आपल्या ठेवी सुरक्षित नसाव्यात, या भीतीपोटी अनेक सभासदांनी एकाच दिवशी पतसंस्थेकडे धाव घेत आपल्या ठेवी काढून घेण्याचा निर्णय घेतला.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीरामपूर शाखेत एका दिवसातच लाखो रुपयांच्या ठेवी सभासदांनी काढून घेतल्या. सकाळपासूनच पतसंस्थेच्या शाखेसमोर सभासदांची गर्दी दिसून येत होती. अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला सभासद तसेच छोटे गुंतवणूकदार आपल्या बचतीच्या रकमेबाबत चिंताग्रस्त अवस्थेत शाखेत दाखल झाले होते. “आधी सुरक्षितता, मग विश्वास” या भूमिकेतून अनेकांनी तातडीने आपली ठेव परत घेण्यास प्राधान्य दिले. पतसंस्थेवर झालेले आरोप अद्याप प्राथमिक स्वरूपाचे असले, तरी त्याची चर्चा सोशल मीडियावर आणि स्थानिक पातळीवर मोठ्या प्रमाणात सुरू आहे. यामुळे सभासदांमध्ये भीतीचे आणि अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठेवीदारांनी “घोटाळा झाला तर आपले पैसे अडकतील का?” असा थेट सवाल उपस्थित केला आहे. काही सभासदांनी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाकडून स्पष्ट व अधिकृत माहिती देण्याची मागणीही केली आहे.

काका कोयटे हे कोपरगाव परिसरात राजकीय व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असल्याने, या प्रकरणाची चर्चा केवळ आर्थिक मर्यादेत न राहता राजकीय वर्तुळातही सुरू झाली आहे. पतसंस्थेसारख्या सहकार क्षेत्रातील संस्थेवर असे आरोप होणे, हे संपूर्ण सहकार चळवळीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची प्रतिक्रिया काही जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे. एकाच दिवसात मोठ्या प्रमाणावर ठेवी काढल्या गेल्याने पतसंस्थेच्या आर्थिक स्थैर्याबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. अशीच स्थिती पुढेही कायम राहिल्यास पतसंस्थेच्या दैनंदिन व्यवहारांवर आणि कर्जवितरण प्रक्रियेवर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सहकार क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, अशा अफवा व आरोपांच्या काळात पारदर्शकता आणि विश्वास निर्माण करणे अत्यंत गरजेचे असते. या संपूर्ण प्रकरणावर समता नागरी पतसंस्थेच्या व्यवस्थापनाकडून अधिकृत भूमिका किंवा स्पष्टीकरण अद्याप समोर आलेले नाही. मात्र, सभासद आणि ठेवीदारांकडून तातडीने खुलासा करण्याची जोरदार मागणी होत आहे. आरोपांमागील सत्य काय आहे, चौकशी होते का, आणि ठेवीदारांचे हित कसे जपले जाणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. समता नागरी पतसंस्थेभोवती निर्माण झालेल्या या वादाच्या भोवऱ्यातून संस्था कशी बाहेर पडते, तसेच या प्रकरणाचे पुढील पडसाद काय उमटतात, याबाबत कोपरगाव व श्रीरामपूर परिसरातील नागरिकांमध्ये उत्सुकता आणि चिंता दोन्हीही तितक्याच प्रमाणात दिसून येत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!