श्रीरामपूर : प्रतिनिधी :- शिक्षणाच्या पवित्र मंदिरातच विद्यार्थिनी असुरक्षित असल्याचे धक्कादायक वास्तव श्रीरामपूर शहरात समोर आले आहे. विद्यार्थ्यांना सुसंस्कार, शिस्त आणि सुरक्षिततेचे धडे देणाऱ्या शाळेतच चार अल्पवयीन मुलींवर अत्याचार झाल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. १९५० सालापासून म्हणजेच तब्बल ७५ वर्षांपासून शिक्षण क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका नामांकित शिक्षण संस्थेच्या प्राथमिक शाळेतील वर्गशिक्षकानेच हा प्रकार केल्याचा आरोप असून, या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलिसांनी आरोपी शिक्षक सचिन गोणारकर याला तात्काळ अटक करून त्याच्याविरुद्ध पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
सदर आरोपी हा पीडित मुलींचाच वर्गशिक्षक असल्याचे तपासातून स्पष्ट झाले आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षक म्हणजे मार्गदर्शक आणि आदर्श व्यक्तिमत्त्व. मात्र, याच विश्वासाचा गैरफायदा घेत आरोपीने वेळोवेळी वर्गातील चार अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन केल्याची माहिती समोर आली आहे.मुलींनी सुरुवातीला भीतीपोटी हा प्रकार दडवून ठेवला होता. मात्र, मानसिक तणाव असह्य झाल्यानंतर त्यांनी आपल्या पालकांना संपूर्ण घटना सांगितली. आपल्या पोटच्या गोळ्यांसोबत घडलेला हा प्रकार ऐकून पालकांच्या पायाखालची जमीनच सरकली.
घटनेची माहिती मिळताच संतप्त पालकांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाणे गाठून आरोपी शिक्षकाविरोधात तक्रार नोंदवली. पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपी सचिन गोणारकर याला ताब्यात घेतले. त्याच्याविरुद्ध लैंगिक अत्याचारांपासून बालकांचे संरक्षण (पोक्सो) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू असून, या प्रकरणात आणखी काही विद्यार्थिनी पीडित आहेत का याची तपासणी केली जात आहे. पीडित मुलींची ओळख गोपनीय ठेवण्यात आली असून, त्यांना समुपदेशनाची मदत देण्यात येत आहे.
प्राथमिक तपासात आरोपीने इतर काही मुलींशीही अशाच प्रकारचे वर्तन केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीतीचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेकांनी शाळा प्रशासनाकडे सुरक्षा उपाययोजनांबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. गेल्या सात दशकांपासून शिक्षण क्षेत्रात नावाजलेली ही संस्था असल्याने या घटनेने शहराला धक्का बसला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी शाळेत कोणती यंत्रणा कार्यरत होती? शिक्षकांच्या वर्तनावर देखरेख ठेवली जात होती का? या बाबत चर्चा सुरू आहे. या घटनेनंतर सामाजिक संघटना आणि नागरिकांनी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी केली आहे. पोक्सो कायद्यानुसार दोषी आढळल्यास कठोर कारावासाची तरतूद आहे.
ही घटना केवळ एका शाळेपुरती मर्यादित नसून संपूर्ण शिक्षण व्यवस्थेसाठी इशारा आहे. शाळांमध्ये बालसुरक्षा धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, तक्रार निवारण समित्या, सीसीटीव्ही देखरेख, तसेच विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची गरज अधोरेखित होत आहे. दरम्यान, आरोपी शिक्षक सध्या पोलिस कोठडीत असून पुढील तपास सुरू आहे. शिक्षणाच्या पवित्र स्थळी घडलेल्या या संतापजनक घटनेमुळे श्रीरामपूर शहर हादरले असून, पीडित मुलींना न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, हीच सर्वांची अपेक्षा आहे.




