Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरश्रीरामपूर शिवसेना महाविकास आघाडीबरोबरच लढणार — जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची स्पष्ट भूमिका

श्रीरामपूर शिवसेना महाविकास आघाडीबरोबरच लढणार — जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची स्पष्ट भूमिका

श्रीरामपूर/प्रतिनिधी :- शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत स्वतंत्र लढण्याचा कोणताही निर्णय झालेला नाही, शिवसेना ही आगामी निवडणूक महाविकास आघाडीच्या बॅनरखालीच लढणार आहे, असे स्पष्ट वक्तव्य शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे (नाना) यांनी अधिकृत पत्रकाद्वारे केले आहे.

अलीकडेच काही स्थानिक तसेच जिल्ह्यातील वृत्तपत्रांमध्ये “शिवसेना स्वतंत्र लढणार” अशी बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले होते. या पार्श्वभूमीवर जिल्हाप्रमुख खेवरे यांनी पत्रक काढून स्पष्ट केले की, शिवसेनेची अशी कोणतीही भूमिका नाही. आम्ही आजही महाविकास आघाडीतील प्रमुख घटक आहोत आणि कॉंग्रेस, राष्ट्रवादी (शरद पवार गट) व इतर सहकाऱ्यांसोबत सन्मानजनक तडजोडी करूनच निवडणुकीला सामोरे जाणार आहोत.

खेवरे यांनी पुढे सांगितले की, महाविकास आघाडीमध्ये सर्वच पक्षांच्या सन्मानाचा विचार करून जागावाटपाचा तोडगा निघाल्यास आम्ही आघाडीच्याच चिन्हावर लढू. मात्र, जर सन्मानजनक तडजोड शक्य झाली नाही, तर स्थानिक प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून आणि सर्वसामान्य नागरिकांना मान्य होईल असा उमेदवार निवडूनच शिवसेना स्वतंत्रपणे उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेईल. परंतु असा कोणताही निर्णय अद्याप झालेला नाही.

जिल्हाप्रमुखांनी माध्यमांना आवाहन केले की, माझ्या नावाने किंवा शिवसेनेच्या नावाने कोणीही परवानगीशिवाय पत्रक प्रसिद्ध करू नये. तसे काही पत्र किंवा बातमी आल्यास संबंधितांनी कृपया थेट माझ्याशी संपर्क साधावा. खेवरे यांच्या या भूमिकेमुळे श्रीरामपूरसह जिल्ह्यातील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये स्पष्टता आली असून, शिवसेना महाविकास आघाडीशी निष्ठावान राहूनच निवडणुकीच्या तयारीस लागणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

पक्षाच्या अंतर्गत चर्चेनुसार, नगराध्यक्षपदासाठी योग्य आणि जनतेला मान्य असा चेहरा पुढे करण्याचा विचार सुरू असून, जनाधार असणाऱ्या आणि कार्यकर्त्यांच्या पाठबळावर निवडून येऊ शकणाऱ्या उमेदवारावरच अंतिम शिक्कामोर्तब होईल, अशी माहिती पत्रकातून देण्यात आली आहे. रावसाहेब खेवरे यांनी शेवटी स्पष्ट केले की, शिवसेना ही संघर्षातून उभी राहिलेली पक्षसंस्था आहे. कार्यकर्त्यांच्या निष्ठेवर आणि जनतेच्या विश्वासावर आम्ही आजही ठाम आहोत. काहीही अफवा पसरवून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होऊ नये, अशी आमची विनंती आहे. खेवरे यांच्या या निवेदनामुळे शिवसेना-आघाडीतील मतभेदांच्या अफवांना पूर्णविराम मिळाल्याचे मानले जात असून, श्रीरामपूर नगरपालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीची एकत्रित लढत निश्चित असल्याचे संकेत मिळत आहेत.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!