Homeमहाराष्ट्रशिर्डीशिर्डी साईबाबा संस्थानात लाखोंच्या दक्षिणा चोरीचा पर्दाफाश; सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठा गैरव्यवहार...

शिर्डी साईबाबा संस्थानात लाखोंच्या दक्षिणा चोरीचा पर्दाफाश; सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे मोठा गैरव्यवहार उघड

शिर्डी : देशभरातील कोट्यवधी भाविकांच्या श्रद्धास्थान असलेल्या शिर्डी साईबाबा संस्थानात गेल्या काही वर्षांपासून लाखो रुपयांच्या दक्षिणेची चोरी होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. संस्थानाच्या सुरक्षा विभागाने सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने केलेल्या सखोल तपासणीतून या आर्थिक गैरव्यवहाराचा भांडाफोड झाला आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात संस्थानातील एका कायमस्वरूपी कर्मचाऱ्याचा थेट सहभाग उघड झाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संस्थानात दर मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी दक्षिणा मोजणी केली जाते. यासाठी अत्याधुनिक नोटा मोजणी यंत्राचा वापर केला जातो. या यंत्राचा गैरफायदा घेत संबंधित कर्मचारी पाचशे रुपयांच्या नोटांचे बंडल चिल्लर मोजण्याच्या बहाण्याने लपवून ठेवत असे आणि नंतर साफसफाईच्या नावाखाली त्यांची चोरी करीत होता. वर्षभराच्या सीसीटीव्ही तपासणीतून या कृत्याचे अनेक ठोस पुरावे समोर आले असून, तरीही अद्याप पोलिसांत गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांचा सहभाग वा दुर्लक्ष यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

या प्रकरणामुळे व्यवस्थात्मक ढिसाळपणा, राजकीय हस्तक्षेप आणि प्रशासकीय अनास्था समोर आली आहे. आरोपी कर्मचारी गावातील प्रभावशाली व्यक्ती असून, स्थानिक राजकीय नेत्यांशी त्याचे घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. त्यामुळेच इतक्या काळ त्याच्यावर कारवाई झाली नसल्याची माहिती मिळत आहे. शिपाई पदावर असूनही त्याचा वावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसारखा असल्याचे आणि इतर कर्मचाऱ्यांवर तो दबाव ठेवत असल्याचेही समोर आले आहे.

संस्थानाचे माजी कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांनी “कोणताही कर्मचारी एका विभागात तीन वर्षांपेक्षा अधिक राहू नये” असा स्पष्ट आदेश दिला होता. मात्र, आरोपी कर्मचारी अनेक वर्षांपासून एकाच विभागात कार्यरत होता. ही नियमभंगाची ठळक बाब या गैरव्यवहाराच्या मुळाशी असल्याचे दिसून येते. त्यामुळे प्रशासनातील गोंधळ आणि भ्रष्ट प्रवृत्तींचे संरक्षण यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे. या प्रकारामुळे संस्थानातील अन्य काही कर्मचाऱ्यांमध्येही चुकीच्या मार्गाने पैसे मिळवण्याची प्रवृत्ती वाढल्याचे बोलले जात आहे. काही माजी कर्मचाऱ्यांनीही यामुळे स्वतःच्या आर्थिक अडचणी वाढल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे हा गैरप्रकार एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादित न राहता, संपूर्ण व्यवस्थेतील सखोल गूंतागुंत असल्याचे स्पष्ट होते.

सध्या या प्रकरणात संबंधित कर्मचाऱ्याच्या बँक खात्यांची तपासणी, मालमत्तेचा आढावा आणि नातेवाईकांशी झालेल्या आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू करण्याची गरज निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे, या कर्मचाऱ्याला मदत करणारे इतर कर्मचारी, अधिकारी किंवा स्थानिक राजकीय मंडळी यांचाही तपास होणे आवश्यक आहे. पूर्वी संस्थानात भाविकांनाही दक्षिणा मोजणी प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी दिली जात होती. मात्र, काही चोरीच्या घटनांनंतर ही प्रक्रिया बंद करण्यात आली. सध्या ही जबाबदारी केवळ कर्मचाऱ्यांवरच असल्याने, अशा घटनांत वाढ होत असेल, तर भाविकांचा संस्थेवरील विश्वास डळमळीत होण्याची भीती व्यक्त होत आहे.

साईबाबांच्या नावाने आलेल्या प्रत्येक पैशात भाविकांची श्रद्धा आणि विश्वास सामावलेला असतो. त्यामुळे अशा दक्षिणेचा गैरवापर म्हणजे केवळ आर्थिक फसवणूक नाही, तर ती भाविकांच्या श्रद्धेवरच आघात आहे. “साईबाबांच्या झोळीत हात घालणाऱ्याला साई माफ करत नाही” हे या प्रकरणातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. या संपूर्ण प्रकरणात दोषींवर कठोर कारवाई होणे अत्यावश्यक आहे. यंत्रणांतील दुर्बलता, नियमांकडे केलेले दुर्लक्ष आणि राजकीय हस्तक्षेप याला वेळीच लगाम घालणं गरजेचं आहे. भाविकांचा विश्वास अबाधित राखण्यासाठी पारदर्शकता, जबाबदारी आणि शिस्त या तीनही गोष्टी शिर्डी साईबाबा संस्थानात बंधनकारक होणे आवश्यक आहे. भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी व्यवस्थेचा पुनर्विचार आणि कडक नियंत्रण हीच एकमेव उपाययोजना ठरू शकते.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
29.7 ° C
29.7 °
29.7 °
70 %
4.5kmh
100 %
Sun
30 °
Mon
29 °
Tue
27 °
Wed
30 °
Thu
31 °

Most Popular

error: Content is protected !!