Homeमहाराष्ट्रराहताविहीरीत चार मुलांसह वडिलांचा मृत्यू : शिर्डी परिसरात खळबळ

विहीरीत चार मुलांसह वडिलांचा मृत्यू : शिर्डी परिसरात खळबळ

राहाता (प्रतिनिधी) : तालुक्यातील कोऱ्हाळे शिवारात शनिवारी दुपारी भीषण घटना उघडकीस आली. येथील साठवण तलावालगत असलेल्या विहिरीत एकाच कुटुंबातील पाच मृतदेह आढळून आल्याने शिर्डी परिसरासह संपूर्ण नगर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. या मृतांमध्ये एका वडिलांसह त्यांची तीन मुले व एक मुलगी यांचा समावेश असून, या हृदय पिळवटून टाकणाऱ्या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

मृतांची ओळख पटलेली असून चिखली (ता. श्रीगोंदा) येथील अरुण सुनील काळे (वय ३०) व त्यांची चार मुले – मुलगी शिवानी, मुलगे प्रेम, वीर व कबीर काळे अशी करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काळे यांची पत्नी काही दिवसांपूर्वी माहेरी (ता. येवला, जि. नाशिक) गेली होती. तिला परत आणण्यासाठी अरुण काळे आपल्या चार मुलांना घेऊन दुचाकीवरून निघाले होते. मात्र कोऱ्हाळे परिसरात आल्यानंतर त्यांनी पत्नीशी संपर्क साधला असता तिने प्रतिसाद देण्यास नकार दिला. यामुळे वैतागलेल्या काळे यांनी दारूच्या नशेत आपल्या चार मुलांना विहिरीत ढकलून स्वतःही त्यात उडी मारली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. घटनास्थळी काही चप्पल व दारूच्या बाटल्या आढळून आल्या. स्थानिक ग्रामस्थ व पोलिस पाटलांनी तात्काळ ही बाब राहाता पोलिसांना कळवली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत विहिरीत शोधमोहीम सुरू केली. यावेळी दोन मुलांचे व वडिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले असून उर्वरित मृतदेह शोधण्याचे काम सुरू होते.

या घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे, शिर्डी उपविभागीय पोलीस अधिकारी वमने यांच्यासह राहाता पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, या घटनेमागील कारणांबाबत उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे. कौटुंबिक कलहामुळे आत्महत्या की काही वेगळा घातपात, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

नगर जिल्ह्यात नुकतीच कोपरगाव तालुक्यात एका महिलेच्या खुनाची घटना घडून त्यात आरोपीसह त्याच्या मेव्हण्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर केवळ आठ दिवसांतच शिर्डी उपविभागीय हद्दीत ही दुसरी गंभीर घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे व अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरम्यान, अरुण काळे यांची मुले नगर तालुक्यातील एका आश्रमशाळेत शिकत होती. अचानक घडलेल्या या घटनेमुळे त्यांच्या मित्रमंडळींसह शिक्षक वर्गातही शोककळा पसरली आहे. पत्नीशी झालेला वाद, दारूचे व्यसन आणि तात्काळ घेतलेला चुकीचा निर्णय या घटकांमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचे दिसून येते. राज्यात एका बाजूला दहीहंडीचा उत्साह सुरू असतानाच शिर्डी परिसरात उघडकीस आलेल्या या घटनेने हृदय पिळवून टाकले आहे. ग्रामीण भागात कौटुंबिक कलह, दारूचे व्यसन आणि नैराश्य या समस्यांवर गंभीरपणे उपाययोजना करण्याची गरज असल्याचे नागरिकांकडून व्यक्त केले जात आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.6 ° C
22.6 °
22.6 °
60 %
1.6kmh
100 %
Fri
23 °
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °

Most Popular

error: Content is protected !!