श्रीरामपूर (प्रतिनिधी) – आगामी नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक एकमधून काँग्रेस पक्षाच्या उमेदवार सोनिया कक्कड आणि दिपक वमने यांच्या प्रचाराची आज औपचारिक व उत्साहपूर्ण सुरुवात झाली. प्रभागाच्या सर्वांगीण विकासाच्या निर्धारातून या प्रचाराचा शुभारंभ गोंधवणी गावातील जागृत देवस्थान महादेव मंदिर परिसरात नारळ फोडून करण्यात आला. प्रारंभापासूनच कार्यकर्त्यांची गर्दी, महिलांचा उत्स्फूर्त सहभाग आणि युवकांचा उत्साह या प्रचार मोहीमेने प्रभागात निवडणुकीचे वातावरण अधिक रंगत आणले.
प्रचाराच्या शुभारंभावेळी माध्यमांशी बोलताना उमेदवार सोनिया कक्कड म्हणाल्या, भागातील महिलांचे सक्षमीकरण, त्यांच्या मुलभूत गरजांची पूर्तता आणि प्रत्येक वयोगटातील नागरिकांसाठी समान सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मी कटिबद्ध आहे. महिलांसाठी सुरक्षित, सक्षम आणि प्रगतिशील वातावरण उभारणे हे माझे प्राधान्य राहील.
तर दुसरे उमेदवार दिपक वमने यांनी प्रभागाच्या व्यापक विकासाची ठोस भूमिका मांडत सांगितले की, आम्ही राजकारण हे सत्तेचं नव्हे तर सेवेचं माध्यम मानतो. नागरिकांच्या अडचणी सोडवणे, प्रभागातील पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि प्रत्येकाच्या स्वप्नांना दिशा देणे, ही आमची जबाबदारी आहे. समाजाच्या प्रत्येक स्तरापर्यंत विकास पोहोचवणे हेच आमचे ध्येय असून प्रभागाचा चेहरा बदलण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न राहील.
काँग्रेसच्या या जोडीच्या प्रचाराला सुरुवात होताच प्रभाग नव्या उत्साहात न्हाऊन निघाल्याचे चित्र दिसत आहे. महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांचा मिळून मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद काँग्रेसच्या उमेदवारांवर नागरिकांचा वाढता विश्वास दर्शवत असल्याचे कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. काँग्रेस पक्षाचा प्रचार आजपासून अधिकृतरीत्या सुरू झाल्याने प्रभाग क्रमांक एकमध्ये निवडणुकीची रंगत अधिक चढू लागली असून पुढील काही दिवसांत प्रचाराला आणखी वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.




