श्रीरामपूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार दत्तात्रय खेमनर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खेमनर यांनी दलित महिलेवरील अत्याचाराच्या प्रकरणात आरोपीवर कारवाई करण्याची मागणी करत वारंवार वृत्त प्रकाशित केले होते. विशेषतः या प्रकरणात प्रकाश चित्ते यांच्यावर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्याच्या पार्श्वभूमीवर त्यांच्यावर अटक करण्यात यावी, अशी पत्रकार खेमनर यांची ठाम भूमिका होती. याच भूमिकेचा राग ठेवूनच त्यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ३० जुलै रोजी सकाळच्या सुमारास खेमनर यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर खेमनर यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली होती. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, हा हल्ला रत्नेश गुलदगड, मनीष मुथ्था, रोहित शिंदे आणि सावकार अमोलिक यांनी केला असून, हा हल्ला प्रकाश चित्ते आणि सुनील मुथ्था यांच्या सांगण्यावरूनच करण्यात आला, असा थेट आरोप खेमनर यांनी केला आहे.
या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अखेर हल्ल्यानंतर तिसऱ्या दिवशी शहर पोलिसांनी वर उल्लेखित चौघांविरुद्ध पत्रकार संरक्षण कायदा तसेच भारतीय दंड संहितेतील संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. तथापि, अद्याप कोणत्याही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे पत्रकार खेमनर यांनी आपल्याला तात्काळ पोलीस संरक्षण देण्यात यावे आणि आरोपींना त्वरीत अटक करण्यात यावी, अशी जोरदार मागणी केली आहे. दरम्यान, पत्रकार संघटनांनीही या प्रकरणी तीव्र संताप व्यक्त केला असून, पत्रकार संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करूनही अटक करण्यात होत असलेल्या दिरंगाईचा निषेध व्यक्त करण्यात येत आहे. ग्रामीण पत्रकार संघटनेने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, जर लवकरात लवकर आरोपींना अटक झाली नाही, तर संपूर्ण राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल.
पत्रकारांवर होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे पत्रकारितेच्या स्वातंत्र्यावर गदा येत असून, गुन्हेगारांना अभय देणाऱ्या प्रवृत्तींवर आळा घालण्यासाठी कठोर कारवाई होणे आवश्यक असल्याची भूमिका विविध पत्रकार संघटनांनी मांडली आहे. स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत असलेल्या या प्रकरणामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे सूत्रांकडून समजते. मात्र, या प्रकरणाचा निकाल लवकर न लागल्यास या प्रकरणावरून सामाजिक आणि पत्रकार क्षेत्रात मोठा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.