Homeमहाराष्ट्रश्रीरामपुरगणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; डीजे मालक व मंडळांच्या अध्यक्षांवर पोलिसांची कारवाई

गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; डीजे मालक व मंडळांच्या अध्यक्षांवर पोलिसांची कारवाई

श्रीरामपूर (प्रतिनिधी) : गणेशोत्सव काळात शहरातील विसर्जन मिरवणुकीत नियमांचे उल्लंघन करून कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा दणदणाट सुरूच राहिला. नागरिकांच्या तक्रारी आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशांकडे दुर्लक्ष करून काही गणेश मंडळांनी व डीजे चालकांनी मोठ्या आवाजात डीजे वाजवले. त्यामुळे पोलिस प्रशासनाने कठोर कारवाई करत तिन्ही गणेश मंडळांचे अध्यक्ष आणि डीजे मालकांवर गुन्हे दाखल करून डीजे सिस्टीम जप्त केली.

ध्वनीप्रदूषण (नियंत्रण व नियंत्रण) अधिनियम 2000 तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या स्पष्ट सूचनांनुसार सण, समारंभ व धार्मिक मिरवणुकांदरम्यान डीजे किंवा वाद्यांचा आवाज ठराविक डेसिबल मर्यादेपेक्षा अधिक वाजविण्यास मज्जाव आहे. याबाबत श्रीरामपुर पोलिसांनी गणेशोत्सवापूर्वीच सर्व मंडळे, डीजे मालक व चालकांना नियमांची जाणीव करून दिली होती. तरीदेखील काही मंडळांनी नियमांची पायमल्ली केली.

पोलिसांनी केलेल्या तपासणीत शंभूराजे मित्र मंडळ अध्यक्ष उमेश छल्लारे व डीजे चालक अश्पाक मोईनोद्दीन तांबोळी, अष्टविनायक मित्र मंडळ अध्यक्ष जयेश सुरेश झरेकर व “गणेश ०९” डीजे मालक-चालक गणेश गिते, तसेच महाकाल मित्र मंडळ अध्यक्ष सनी गौतम व “सद्गुरु डीजे”चे मालक-चालक निखील विलास बनसोडे हे नियमभंग करताना आढळले. त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले असून संबंधित डीजे सिस्टीम जप्त करण्यात आली आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे व उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनाखाली, श्रीरामपुर शहर पोलीस निरीक्षक नितीन देशमुख यांच्या नेतृत्वाखाली चा.स.फौ. सुर्यवंशी, पो.हे.को. दिपक कदम, प्रसाद साळवे, पो.ना. दादासाहेब लोढे, पो.को. आंबादास आंधळे, पो.का. आजिनाथ आंधळे तसेच होमगार्ड देवकुळे व कलंके यांनी केली आहे. या कारवाईमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत असून, भविष्यातही नियमभंग करणाऱ्यांवर प्रशासनाने याचप्रमाणे कठोर पावले उचलावीत, अशी मागणी होत आहे.

RELATED ARTICLES
Jharkhand
overcast clouds
22.4 ° C
22.4 °
22.4 °
62 %
1.7kmh
100 %
Sat
35 °
Sun
36 °
Mon
39 °
Tue
38 °
Wed
37 °

Most Popular

error: Content is protected !!