श्रीरामपूर (प्रतिनिधी) –तालुक्यातील खंडाळा गावात परमपूज्य श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपाशीर्वादाने आणि भक्तीमय वातावरणात पिंपळाचा वाडा येथील श्री स्वामी समर्थ सेवा केंद्रात एका अनोख्या विवाह सोहळ्याला साक्षीदार होता येण्याचा योग अनेक सेवेकऱ्यांना आणि उपस्थितांना मिळाला. कोणताही दिखावा, हुंडा किंवा धामधूम न करता, अत्यंत साधेपणाने आणि अध्यात्मिक वातावरणात पार पडलेला हा विवाह परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र, पिंपळाचा वाडा, खंडाळा येथे गेल्या सात वर्षांपासून प्रत्येक रविवारी ‘प्रश्नोत्तर विभाग’ व ‘विवाह मार्गदर्शन सेवा’ अखंड सुरू आहे. याच सेवा उपक्रमाद्वारे यवतमाळ जिल्ह्यातील अनुपमा गाडेकर आणि राहाता तालुक्यातील वाकडी गावचे दिनेश कोहकडे यांची ओळख घडली. दोघेही विवाह विषयक मार्गदर्शनासाठी सेवा केंद्रात आले होते. त्यावेळी त्यांच्या स्थळाची प्राथमिक चर्चा करण्यात आली आणि दोन्ही कुटुंबीयांनी परस्पर सहमतीने हे नातं मान्य केलं.
सर्व पारंपरिक आणि आध्यात्मिक मुल्यांवर आधारित हा विवाह २९ जून रोजी सेवा केंद्राच्या जागेतच पार पडला. कोणतेही फॅन्सी डेकोरेशन, संगीत, पार्टी किंवा आर्थिक खर्च टाळून, अत्यंत साध्या पण मंगलमय पद्धतीने विवाह विधी पार पाडण्यात आले. दिंडोरी दरबार यज्ञिकी विभागाचे शास्त्री श्री बाळकृष्ण पांगरकर यांच्या वेदघोष आणि मंत्रोच्चारामध्ये विवाह संस्कार झाले. विवाहानंतर युवा भागवत कथाकार बाबा महाराज खंडाळकर यांनी उपस्थितांना विवाह संस्कारामागील अध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व विशद केले. त्यांनी या सोहळ्याचे केवळ दोन व्यक्तींचे नाही तर दोन कुटुंबांचे एकत्र येणारे, पवित्र आणि सेवाभावाने युक्त असे सामाजिक बंधन असल्याचे सांगितले. या विवाहाला केवळ सेवा केंद्रातील सेवेकरी व दोन्ही घरचे थोडेसे नातेवाईक उपस्थित होते. कोणतीही तामझाम, आहेर वा बडेजाव न करता, केवळ भक्ती, समर्पण आणि सामंजस्याच्या भावनेतून या विवाहाचे आयोजन करण्यात आले होते. परिणामी, या विवाह सोहळ्याला आध्यात्मिक पवित्रतेचा एक वेगळाच साज चढला होता. सेवा केंद्रात पार पडलेला हा विवाह केवळ एक कौटुंबिक सोहळा न राहता, नवविवाहितांसह उपस्थित सेवेकऱ्यांसाठीही एक प्रेरणादायी अध्यात्मिक अनुभव ठरला. “सेवा स्थळी घडलेला हा विवाह सोहळा म्हणजे विवाह संस्कारांतील मूळ मूल्यांना पुन्हा उजाळा देणारी शिकवण आहे,” अशा भावना सहभागी व पाहुण्यांनी व्यक्त केल्या. या आगळ्या-वेगळ्या विवाह सोहळ्याने समाजातील हुंडा, खर्चीक लग्न आणि भपका यांना नकार देत, विवेकपूर्ण आणि भक्तिपूर्ण लग्नसंस्कारांचे एक सुंदर उदाहरण समाजासमोर ठेवले आहे.